स्टार प्रवाह वाहिनीवर काही दिवसांपूर्वी सुरू झालेली ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. स्टार प्रवाहचीच जुनी लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी होताना दिसत आहे. यामागचं कारण म्हणजे कलाकारांचा सशक्त अभिनय.

कलाकारांचा अभिनय, मालिकेच्या कथानकातील ट्विस्ट यामुळेच मालिकेनं पहिल्याच आठवड्यात ६.७ हा टीआरपी मिळवला होता. याबद्दल प्रेक्षकांकडून कलाकारांचं कौतूक करण्यात आलं होतं. तसंच गिरिजा प्रभूने मालिकेत केलेल्या एका कठीण सीनमुळेही ती कौतुकास पात्र ठरली होती. गिरिजाने कमळाच्या दलदलीत जाऊन एका सीनचं शुटींग केलं होतं. या सीनचे अनेक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

या सीनसाठी गिरिजाने खूप मेहनत केली होती. या खास सीनच्या चित्रीकरणाचा अनुभव कसा होता? याबद्दल गिरिजाने प्रतिक्रिया दिली आहे. ‘अल्ट्रा मराठी बझ’ला दिलेल्या मुलाखतीत गिरिजाने चिखलतील सीनच्या शुटींगच्या अनुभवाबद्दल म्हटलं, “आधी लाठीकाठी केली. त्यानंतर पाण्यात शुटींग केलं. यामुळे एक आत्मविश्वास आला. चिखलात उतरल्याच्या सीनबद्दल कळलं तेव्हा मी ‘ठीक आहे’ असं म्हटलं होतं. तेव्हा मी जास्त विचार केला नव्हता.”

यापुढे गिरिजा म्हणाली, “शुटींगच्या दिवशी जेव्हा मी पाण्यात उतरले. तेव्हा सुरुवातीला खडी होती. ती खडी पायांना टोचत होती. त्यानंतर मी पुढे पुढे जात होते, तर दलदल होती. मी साडी नेसली होती आणि ती साडी पाण्यामुळे फुगून वर येत होती. त्यानंतर आणखी आत गेले, तर अनेक वेली होत्या, काटे रुतत होते. ते सगळं करत करत आम्ही तो सीन शूट केलं.”

यानंतर गिरिजाने ही अनेकांची मेहनत असल्याचं म्हटलं. याबद्दल ती म्हणाली, “अर्थात हे सगळं टीमवर्क आहे. यात अनेकांची मेहनत आहे. त्या सीनपुरतं नव्हे, तर प्रत्येक सीनमागे अनेकांची मेहनत असते. ते कुणा एकट्या व्यक्तीमुळे शक्य होत नाही. यात सगळ्या टीमची मिळून मेहनत असते. या सगळ्यात मला कामाचं कौतूक होणं हे खूप महत्त्वाचं वाटतं. आपण केलेली मेहनत प्रेक्षकांना आवडणं आणि त्याचं कौतूक होणं यामुळे खूप हुरूप येतो.”

यापुढे गिरिजा म्हणाली. सुरुवातीला पाण्यात उतरले तेव्हा मनात ही भीती होती. कारण खाली दलदल होती; ज्यामुळे पाय घसरत होता. शिवाय वेलींमध्येही पाय अडकत होता. मग काही वेळाने जेव्हा कॅमेऱ्याची टीम त्या पाण्यात उतरली, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की, बाहेरून हे खूप सोपं वाटत होतं, पण पाण्यात आल्यानंतर ते वाटतं तितकं सोपं नाही. पण अर्थात सगळ्यांच्या मेहनतीमुळेच तो सीन झाला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेचं चित्रीकरण सध्या कुडाळमध्ये सुरू आहे. कुडाळमधल्याच वालावल मंदिराजवळच्या तलावात हा सीन शूट करण्यात आला आहे. दलदल आणि कमळांचं पसरलेलं तळं यामध्ये शूट करणं अभिनेत्रीसाठी जोखमीचं होतं. मात्र मालिकेच्या संपूर्ण टीमच्या मदतीने गिरीजाने यशस्वीरित्या हा सीन पूर्ण केला.