Popular Actor returns to Zee Marathi: गेल्या काही महिन्यांत नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यामध्ये ‘सुना येती घरा’, ‘आमच्या लाडक्या नाईकबाई’, ‘विसरू नको तू मला’, ‘कृष्णाईच्या लेकी’, ‘बाई तुझा आशीर्वाद’, या मालिकांचा समावेश आहे. या मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आणि आपल्या आपल्या आवडत्या कलाकारांना पडद्यावर पाहण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.

१८ वर्षांनंतर ‘हा’ अभिनेता झी मराठीवर परतणार

आता झी मराठी वाहिनीवर एक नवीन मालिका प्रदर्शित होणार आहे. या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. इच्छाधारी नागीण असे या मालिकेचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेचे एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पोस्टरमध्ये गौरी शेळगांवकर इच्छाधारी नागिणीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे पाहायला मिळाले.

या मालिकेत आणखी एक लोकप्रिय चेहरा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे उघड झाले आहे. लोकप्रिय अभिनेता गिरीश परदेशी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्याने स्वत: याचा खुलासा केला आहे.

काही दिवसांपूर्वी मालिकेचा मुहूर्त पार पडला होता. त्याचा एक फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला. या पाटीवर ११ जून २०२६ ला मुहूर्त पार पडल्याचे दिसत आहे. तसेच, दिग्दर्शक व निर्मात्याचे नावदेखील त्यावर लिहिले आहे. मालिकेची निर्मिती शशांक सोळंकी यांनी केली आहे; तर दिग्दर्शन प्रदीप जाधव यांनी केले आहे. हा फोटो शेअर करीत अभिनेत्याने लिहिले, ” ‘या सुखांनो या’ व ‘वहिनीसाहेब’नंतर १८ वर्षांनी परत एकदा झी मराठीवर येतोय. लोभ असावा. बाकी डिटेल्स लवकरच कळवतो”, असे लिहीत गिरीश परदेशीने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

अभिनेत्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी अभिनंदन असे लिहीत शुभेच्छा दिल्या आहेत.

‘या सुखांनो या’ ही मालिका २००५ मध्ये प्रदर्शित झाली होती. २००८ मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. ‘वहिनीसाहेब’ ही मालिका २००६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. जवळजवळ तीन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर २००९ मध्ये ही मालिका संपली होती.

दरम्यान, आता ‘इच्छाधारी नागिण’मध्ये आणखी कोणते कलाकार दिसणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.