Krushna Abhishek-Sunita Ahuja patch up video: पडद्यावर दिसणारे कलाकार फक्त त्यांच्या कलाकृतींमधूनच नाही तर त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत येतात. त्यांचे कुटुंब, त्यांची मुले, रिलेशनशिप, नातेवाईक तसेच, त्यांच्या वक्तव्यांचीदेखील अनेकदा चर्चा होताना दिसते.

गोविंदा हा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. ९० च्या दशकात त्याचे अनेक सिनेमे गाजले आहे. हिरो नंबर १, दुल्हे राजा, हसीना मान जाएँगी, बडे मियाँ छोटे मियाँ अशा अनेक चित्रपटांतून गोविंदाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याच्या चित्रपटातील गाणीदेखील मोठ्या प्रमाणात गाजली. तसेच, अभिनयाबरोबरच गोविंदा त्याच्या डान्समधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला.

गेल्या काही वर्षांत गोविंदा फार चित्रपटांत दिसला नाही. मात्र, तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत राहिला. भाचा कृष्णा अभिषेक व त्याची पत्नी कश्मीरा शाह यांच्याबरोबर त्याचे व त्याच्या पत्नीचे विवाद असल्याचे समोर आले होते. त्यांच्यामध्ये अबोला होता. २०२४ मध्ये गोविंदा व कृष्णा अभिषेक यांच्यातील मतभेद संपले होते. त्यांच्यातील दुरावा संपल्याचे पाहायला मिळाले. आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाचा कृष्णा अभिषेक व कश्मीरा शाहबरोबर सुनिता आहुजाचे रियुनियन

हा व्हिडीओ व्हायरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कश्मीरा शाह, कृष्णा अभिषेक आणि त्यांच्याबरोबर सुनीता आहुजा दिसत आहे. कृष्णा म्हणतो की आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. त्यानंतर सुनीता आहुजा म्हणते, “१४ वर्षांचा वनवास संपला”, त्यानंतर ते तिघेही हसताना दिसत आहेत.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. “तुम्हाला सगळ्यांना एकत्र पाहून आनंद झाला”, “मी त्यांच्यासाठी खूप आनंदी आहे”, “कृष्णा मला खूप आवडतो”, “या सगळ्यांना एकत्र पाहून किती छान वाटत आहे”, “पुन्हा एकदा ते एकत्र आले, याचा आनंद आहे”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

२०२४ मध्ये ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये गोविंदाने फिल्मों के सारे हिरो’ या गाण्यावर एकत्र डान्स केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर कृष्णाने गोविंदाला घट्ट मिठी मारत ‘मामा नंबर १’ असे म्हटले होते. त्यावेळी गोविंदाने असेही सांगितले होते की,जेव्हा मी पायावर गोळी मारली आणि मला दवाखान्यात दाखल केले तेव्हा हा खूप रडला होता.

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये कृष्णा अभिषेकने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. तो म्हणालेला “आजचा दिवस हा आठवणीत राहणाऱ्या दिवसांपैकी एक आहे. मी सात वर्षांचा वनवास आज पूर्ण केला आहे.” हे ऐकल्यानंतर गोविंदाने म्हटलेले, “माझी मोठी बहीण मला माझ्या आईसारखी होती. कृष्णा तिचा मुलगा आहे. माझ्याकडून कधीही वनवास नव्हता. तो माझी मिमिक्री करत होता, म्हणून एकदा त्याच्यावर खूप रागावलो होतो, त्यामुळे तो माझ्यापासून दूर राहिला. मात्र, माझ्या पत्नीने मला सांगितले की संपूर्ण इंडस्ट्री तेच करत आहे, तुम्ही कृष्णाला काही म्हणू नका, त्याला पैसे कमवू द्या.”

पुढे गोविंदाने कृष्णा अभिषेकला पत्नी सुनिता अहुजाची माफी मागण्यास सांगताना म्हटलेले, “तिची माफी माग. ती तुझ्यावर प्रेम करते.” यावर कृष्णाने म्हटले, “मीदेखील तिच्यावर प्रेम करतो, मी दुखावलं असेल तर माफी मागतो.”

दरम्यान, गोविंदा आता यावर काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.