Halad Rusli Kunku Hasla Serial : अभिनेत्री समृद्धी केळकर व अभिनेता अभिषेक रहाळकर यांची मुख्य भूमिका असलेली ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका सोमवारपासून (७ जुलै) सुरू होणार आहे. या मालिकेत समृद्धी व अभिषेक व्यतिरिक्त इतर काही प्रसिद्ध कलाकारांचीही वर्णी लागली आहे.

‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेत प्रसिद्ध अभिनेता आस्ताद काळेसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहे. नवीन मालिकेनिमित्त अभिनेत्याने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने त्याच्या मालिकेतील भूमिकेबद्दल सांगितलं आहे. या मालिकेत आस्ताद त्याच्या वयापेक्षा मोठी भूमिका साकारत आहे.

आस्तादला मुलाखतीमध्ये “तुझ्या वयापेक्षा मोठी भूमिका साकारण्याचं दडपण आहे का?” असं विचारण्यात आलेलं. यावर तो म्हणाला, “दडपण होतं, पण ती भीती नसून कामाची उत्सुक्ता होती. या आधी मी वडिलांची भूमिका केली होती, पण त्या भूमिकेचं वय माझ्या वयापेक्षा फार जास्त नव्हतं. पण, आता मी या मालिकेत जी भूमिका साकारत आहे त्या भूमिकेचं वय ५५ ते ६० असं आहे, जे आता माझ्या वयाच्या १३-१८ वर्षांपेक्षा जास्त आहे.”

भूमिकेबद्दल आस्ताद म्हणाला, “भूमिकेचं वय जास्त असल्याने मला नट म्हणून हे आव्हानात्मक वाटतं. भीती अशी कधीच वाटली नव्हती आणि आता मला याच वयाच्या भूमिका मिळतील वगैरे अशी भीती अजिबातच वाटत नाही. पण, आव्हनात्मक यासाठी वाटते कारण हे खोटं नाही वाटलं पाहिजे. तसं झालं तर नट म्हणून फसलो किंवा कमी पडलो असं मला वाटेल.”

आस्ताद याबाबत पुढे म्हणाला, “लोकांना माझं खरं वय माहीत आहे, त्यामुळे ते यासाठीसुद्धा मालिका बघतील की हा रोल हा कसा करेल. मला अशी एक कमेंटही आली होती की, अरे हा एवढा म्हातारा कधी झाला? मी त्या कमेंटला काही रिप्लाय दिला नाही. मी सकारत्मकदृष्टीने याकडे पाहिलं, त्यामुळे मला भीती नव्हतीच, पण मी यासाठी खूप उत्सुक आहे.”

आस्ताद पुढे मालिकेबद्दल म्हणाला, “मालिका आता लवकरच सुरू होईल आणि प्रेक्षकांच्या आशीर्वादाने आम्ही हजार-दीड हजार भागांचा टप्पासुद्धा गाठू शकतो. तर तेवढा वेळ या भूमिकेचंही वय वाढणार, त्यामुळे मी या भूमिकेला काय नवीन देऊ शकतो, जे कृत्रिम नाही वाटले पाहिजे आणि डेली सोप म्हटल्यानंतर २२ ते २५ दिवस मला हेच करायचं आहे; रोज त्यामुळे मला हेही आव्हानात्मक वाटतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेत अभिषेक रहाळकर, समृद्धी केळकर, आस्ताद काळे, पूजा साळुंखे, ज्योती निमसे, माधवी जुवेकर यांसारखे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहेत. या मालिकेतून समृद्धी केळकर व अभिषेक रहाळकर हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत, त्यामुळे या फ्रेश जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहणं रंजक ठरेल. ही मालिका दुपारी १ वाजता ‘स्टार प्रवाह’वर पाहता येणार आहे.