Hardeek Joshi Akshaya Deodhar : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये दोघांनी राणादा अन् पाठकबाईंची भूमिका साकारली होती. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने जवळपास साडेचार वर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिका संपल्यावर ही Reel जोडी, Real आयुष्यात सुद्धा एकत्र आली. हार्दिक-अक्षयाच्या साखरपुड्याची बातमी समोर येताच त्यांच्या सर्वच चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. मे २०२२ मध्ये साखरपुडा केल्यावर या दोघांनी डिसेंबर २०२२ मध्ये थाटामाटात लग्न केलं.

अक्षया-हार्दिकची मालिकेदरम्यान फक्त मैत्री होती. त्यानंतर दोघांनी वर्षभराने लग्न केलं. याबद्दल सांगताना हार्दिक ‘द अनुरुप शो’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “मी अक्षयाला थेट तिच्या घरी जाऊनच लग्नाची मागणी घातली होती. खरंतर, माझी आई माझ्या मागे लागली होती…तिला अक्षया खूप आवडायची. २०१७ मध्येच या दोघींचं बोलणं झालं होतं. माझी आई तिला म्हणाली होती, ‘मला तू सून म्हणून आवडतेस’ मला याबद्दल फार नंतर समजलं. मी अक्षयाच्या घरी जाऊन तिच्या आई-बाबांना म्हणजेच माझ्या सासू-सासऱ्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं, ‘बघा… मी किती फाटका आहे, हे तुमच्या मुलीला माहितीये…माझी लाइफस्टाइल, माझे खर्च सगळं तिला माहीत आहे. याशिवाय माझ्या कुटुंबाबद्दलही तिला कल्पना होती. मला तुमच्या कोणाच्याही विरोधात जाऊन काहीच करायचं नाहीये’… इतकंच मी तिच्या आई-बाबांसमोर बोललो आणि त्यांच्या घरून निघालो.”

मी शंभर टक्के या नात्यासाठी तयार होते…

अक्षया यावर म्हणाली, “माझ्या घरच्यांचं असं होतं की, तुला सगळं त्याच्याबद्दल माहितीये ना? मग विषय संपला. फक्त माझ्या आईने इतकंच सांगितलं, तू जे नातं सुरू करणार आहेस ते निभाव! हार्दिकने लग्नासाठी विचारल्यावर मी शंभर टक्के या नात्यासाठी तयार होते. पण, माझ्या घरच्यांना हे सगळं पटेपर्यंत महिन्याभराचा वेळ गेला, एकंदर सगळेच या नात्यासाठी तयारच होते.”

हार्दिक यावर म्हणाला, “अक्षयाच्या घरी जाऊन आल्यावर महिन्याभराचा वेळ गेला. त्यावेळी माझ्या दुसऱ्या एका मालिकेचंही शूटिंग सुरू होतं. तेव्हा अक्षयाच्या घरच्यांनी मला अचानक लग्नाच्या तारखा पाठवल्या. त्यानंतर अगदी दोन दिवसांत आमचा साखरपुडा झाला. कारण, अक्षयाचा जन्म अक्षय्य तृतीयेला झाला होता…आणि ३ मे २०२२ रोजी अक्षय्य तृतीया होती म्हणून लगेच आम्ही साखरपुडा केला. माझी आई तर खूप जास्त खूश होती.”

पारंपरिक पद्धतीने लग्न करायचं होतं…

“पुढे लग्न आम्ही डिसेंबर महिन्यात ( २०२२ ) केलं. आम्हाला दोघांना पारंपरिक आणि मोठं लग्न करायचं होतं, कारण अर्थात सर्वांना आम्हाला लग्नाला बोलवायचं होतं. जी आपली संस्कृती आहे…त्याला धरून आम्ही लग्न केलं. झेंडुची फुलं, केळीचे खांब हे सगळं आम्हाला लग्नात हवं होतं, आणि आमच्या लग्नात बरेच लोक आले होते. खरंतर, ज्यांना आम्ही ओळखतही नाही असे बरेच लोक आमच्या लग्नाला आले होते.” असं अक्षयाने सांगितलं.