‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता हार्दिक जोशी घराघरांत लोकप्रिय झाला. त्याने या मालिकेत साकारलेली राणादाची भूमिका सर्वांच्या पसंतीस उतरली होती. मालिका संपल्यावर हार्दिक-अक्षयाची जोडी खऱ्या आयुष्यात सुद्धा एकत्र आली. २०२२ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर जेव्हा कुटुंबावर कठीण प्रसंग ओढवला त्यावेळी अक्षयाने खंबीर साथ दिल्याचं हार्दिक जोशीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
हार्दिक जोशीच्या मोठ्या वहिनीचं नोव्हेंबर २०२३ मध्ये निधन झालं. वहिनी आमच्या घराचा खूप मोठा आधार होती तिच्याबद्दल हार्दिक ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “वहिनीने मला कायम खंबीर पाठिंबा दिला, तिच्यामुळेच मी एक कलाकार म्हणून उभा राहू शकलो. मी सुरुवातीला ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करायचो. त्यावेळी माझ्या भावाने आणि वहिनीने बुलेट घेतली होती…तेव्हा त्यांनी मला रोज प्रवास करण्यासाठी स्वत:ची बुलेट दिली होती आणि दादा रिक्षाने जायचा. त्यानंतर घरातली पहिली गाडी सुद्धा वहिनीने घेतली होती. तुला नोकरी करायची नाहीये ना? मग करू नकोस हे वहिनीचं पहिल्यापासून ठाम मत होतं. तिला सगळेजण राणाची वहिनी म्हणून ओळखू लागले होते…तेव्हा ती खूप खुश व्हायची. वहिनी-दिराचं कमी आणि आमच्यात भावा-बहिणीचं नातं जास्त होतं.”
अक्षयाने स्वत:चं करिअर थांबवलं…
हार्दिक पुढे म्हणाला, “वहिनी आम्हाला सोडून गेली आणि होत्याचं नव्हतं झालं…या काळात मला अक्षयाने खूप सपोर्ट केला. तिने स्वत:चं करिअर थांबवलं. तिला मधल्या काळात अनेक ऑफर्स आल्या होत्या. माझ्यामते अक्षयाने १२-१३ मालिका सोडल्या कारण, तेव्हा मी काम करत होतो आणि घराकडे कोणीतरी एकाने लक्ष देणं भाग होतं. मी सगळं बघते हे तिने मला स्वत:हून सांगितलं.”
मी शो सोडणार होतो…
“जाऊबाई गावात हा शो मला मिळाला, त्याचा प्रोमो वगैरे शूट झाला. प्रोमो ऑन एअर झाला आणि त्याच दिवशी सकाळी डॉक्टरांनी सांगितलं आता वहिनीला कधीही काहीही होऊ शकतं. मी तेव्हा लगेच झीच्या ऑफिसला फोन केला आणि मला शो जमणार नाही असं सांगितलं. त्यानंतर झी मराठीची टीम पुण्यात आली होती, त्यांनी वहिनीला पाहिलं. ते म्हणाले, हार्दिक काहीही काळजी करू नकोस आम्ही तुझ्याबरोबर आहोत. त्यावेळी वहिनीला समजलं की, मी हा शो सोडतोय. तेव्हा वहिनीला ऑक्सिजन लावलं होतं तरीही ती म्हणाली होती, माझी शपथ आहे तुला…हा शो सोडलास तर बघ…मला प्रॉमिस कर की हा शो तू करणार आहेस.”
“पण, दुर्दैवाने पहिला एपिसोड ऑन एअर झाला तेव्हा वहिनी या जगात नव्हती. ४ डिसेंबरला शो सुरू झाला आणि तिच माझ्या वहिनीची जन्मतारीख होती…याचा अर्थ तिचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर होता. वहिनीचे अंत्यसंस्कार करून मी पहिल्या एपिसोडच्या शूटला गेलो होतो. मी नेहमी सर्वांना सांगतो, कलाकार घरातल्या लोकांबरोबर सुखात सुद्धा नसतात आणि दु:खात सुद्धा नसतात. कारण शो मस्ट गो ऑन! हे पाळाव लागतं.” असं सांगत हार्दिकने आपलं दु:ख व्यक्त केलं.

