‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अभिनेता हार्दिक जोशी घराघरांत लोकप्रिय झाला. यामध्ये त्याने साकारलेल्या साध्याभोळ्या राणादाची भूमिका प्रत्येकाला भावली. मात्र, या राणादाच्या भूमिकेसाठी हार्दिकला भरपूर मेहनत घ्यावी लागली होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिरियलमध्ये राणादा पैलवान असतो. त्यामुळे यासाठी अभिनेत्याला तब्बल ३० ते ३५ किलो वजन वाढवणं गरजेचं होतं. हा टास्क हार्दिकने जिद्दीने पूर्ण केला. यानंतर यात मालिकेत रणविजय ही भूमिका साकारण्यासाठी राणाला वाढवलेलं वजन घटवणं गरजेचं होतं. त्यावेळी अभिनेत्याने अवघ्या १५ दिवसांत जवळपास ८ किलो वजन कमी केलं होतं.
राणादाची भूमिका स्वीकारण्याआधी हार्दिक खूपच बारीक होता. हा संपूर्ण प्रवास आणि पुन्हा एकदा वजन घटवण्याचं नेमकं कारण काय आहे याबद्दल हार्दिकने ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
हार्दिक जोशी म्हणाला, “राणाची भूमिका साकारण्याआधी मी खूप बारीक होतो आणि मला वाटतं ती एक कलाकृती होती….राणादा या भूमिकेसाठी मी जवळपास ३० ते ३५ किलो वजन वाढवलं होतं. ते सुद्धा अगदी महिन्याभराच्या आत…त्यामुळे कलाकारांच्या आयुष्यात हे असे बदल होत असतात. मी नेहमी प्रेक्षकांना सुद्धा हे सांगत असतो, हार्दिक जोशी हा प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तुमच्यासमोर वेगळं काहीतरी घेऊन येईल.”
अभिनेता पुढे म्हणाला, “भविष्यात जर असा कोणता राणादाच्या भूमिकेसारखा प्रोजेक्ट माझ्याजवळ आला तर मी नक्कीच पुन्हा एकदा वजन वाढवेन. तेव्हा सुद्धा १५ दिवस खूप होतील…कथानक व भूमिकेनुसार मी पुन्हा एकदा रांगडा गडी होऊन सर्वांसमोर येऊ शकतो.”
फिटनेस ट्रेनिंग विषयी हार्दिक सांगतो, “मला कोणतंही व्यसन नाहीये, मी फार पार्टी वगैरेला जात नाही. मला माझ्या घरातल्या लोकांबरोबर वेळ घालवायला खूप आवडतं, याशिवाय मला फिरण्याची आवड आहे. मी आठवीत असल्यापासून व्यायाम करतो. कॉलेजमध्ये असताना मला बेस्ट रॅम्पवॉक, बेस्ट मॉडेल असे पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. मला जेव्हा राणादाच्या भूमिकेसाठी निवडलं तेव्हा अॅब्स दिसायचे. मग नंतर पोट वाढवावं लागेल असं सांगण्यात आलं. सेलिब्रिटी ट्रेनर विनोद चन्ना यांनी मला प्रवासात मार्गदर्शन केलं होतं. विनोद चन्ना हे जॉन अब्राहम, नीता अंबानी यांचे ट्रेनर आहेत. त्यामुळे त्या पाच वर्षात रोज माझी तालीम व्हायची, फिटनेसकडे खूप लक्ष दिलं होतं.”
“आता मध्यंतरीच्या काळात मी पुन्हा स्वत:ला वेळ द्यायचं ठरवलं. मी महिन्याभरात स्वत:कडे खूप लक्ष दिलं आणि वजन कमी केलं. आपण नेहमीच स्वत:कडे लक्ष दिलं पाहिजे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेनंतर लगेच मला ‘झी मराठी’ची ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’ ही मालिका मिळाली होती. तेव्हा मी वजन घटवलं होतं. नव्या मालिकेचं शूटिंग सुरू होण्यापूर्वी मी गावी गेलो…एकटा राहिलो. दररोज १० ते १५ किलोमीटर चालायचो. कारण मी तसाच राहिलो असतो तर लोकांना नव्या सिरियलमध्येही मी राणासारखाच दिसलो असतो.” असं हार्दिकने सांगितलं.
