Sharmila Shinde’s emotional post for Harshada Khanvilkar: हर्षदा खानविलकर सध्या ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत काम करत आहेत. या मालिकेत त्यांनी लक्ष्मी ही भूमिका साकारली आहे. साधी, मध्यमवर्गीय कुटुंबातील, पतीवर प्रचंड प्रेम व विश्वास असलेली, कुटुंबासाठी सतत कष्ट करत राहणाऱ्या लक्ष्मीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आता मात्र हर्षदा खानविलकर एका नव्या भूमिकेतून आणि एका नवीन कलाकृतीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

काही दिवसांपूर्वी हर्षदा खानविलकर यांनी व्हिडीओ शेअर करत नाटकात काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते, त्यानंतर सुनील बर्वे यांनीदेखील नाटकात काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. दोन्ही लोकप्रिय कलाकारांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर काहीच दिवसांत प्रिया व उमेश बापट यांनी हर्षदा खानविलकर व सुनील बर्वे यांची भेट घेत त्यांना नाटकाची संहिता दिली होती. आता लवकरच हर्षदा खानविलकर व सुनील बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेले नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी’ असे या नाटकाचे नाव आहे. प्रिया बापट व उमेश कामत यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे.

‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी’ या नाटकात हर्षदा खानविलकर आणि सुनील बर्वे यांच्याबरोबर शर्मिला शिंदे, अक्षर कोठारी, वैष्णवी आंबवणे आणि शंतनू ठवळी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या नाटकाचं लेखन अमोल पाटील यांनी केले आहे, तर दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केले आहे. यामध्ये तीन पिढ्यांची गोष्ट पाहायला मिळत आहेत.

शर्मिला शिंदे व हर्षदा खानविलकर यांनी याआधी ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत एकत्र काम केले आहे. सासू-सुनेच्या भूमिकेत त्या दिसल्या होत्या. हर्षदा खानविलकर या आक्कासाहेब भूमिकेत होत्या, तर रुपाली ही भूमिका शर्मिलाने साकारली होती. आता ही ऑनस्क्रीन सासू-सुनेची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. या निमित्ताने शर्मिलाने हर्षदा खानविलकर यांच्यासाठी खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

“माँ, तू खूप वर्षांनी…”

तिने नाटकाच्या तालमीदरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले, “हा फोटो आपल्या नवीन नाटकाच्या तालमीच्या अगदी सुरुवातीच्या दिवसातला आहे. माँ, तू खूप वर्षांनी रंगभूमीवर परत पाऊल टाकत आहेस, आपण २०११ साली स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमध्ये सासू सून म्हणून एकत्र पाऊल टाकलं होतं. आता पुन्हा एकदा सासू सून म्हणून आपल्या आगामी ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी’ ह्या नाटकात एकत्र येतोय.”

पुढे तिने लिहिले, “तू बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर परत येत आहेस, म्हणूनच हे नाटक तुझ्यासाठी किती खास आहे याची मला कल्पना आहे. गेले महिनाभर आपण आपल्या या नाटकाची तालीम करतोय आणि येत्या ९ मे रोजी आपण आपलं नाटक प्रेक्षकांना सुपूर्त करणार. माँ तुला ह्या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा. हे नाटक तुला खूप खूप आनंद देवो याच सदिच्छा. तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी घेऊन आपल्या नव्या पर्वाची सुरुवात करायला मीसुद्धा उत्सुक आहे, आय लव्ह यू.”

शेवटी तिने चाहत्यांना उद्देशून लिहिले, “सर्वांना आग्रहाचं आमंत्रण. आमच्या मम्माच्या नाटकाला यायचं हां”, असे लिहित भावना व्यक्त केल्या.

तिच्या या पोस्टवर प्रिया बापटसह अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत, तर हर्षदा खानविलकर यांनीदेखील कमेंट करत प्रेम व्यक्त केले आहे. दरम्यान, ९ मे २०२६ ला आमच्या पिढीची गोष्टच वेगळी या नाटकाचा पहिला प्रयोग आहे.