Harshada Khanvilkar Birthday : हर्षदा खानविलकर यांना मराठी इंडस्ट्रीची ‘मम्मा’ म्हणून ओळखलं जातं. गेल्या अनेक दशकांपासून त्या मराठी कलाविश्वात सक्रिय आहेत. मराठी मालिका असो, सिनेमा असो किंवा नाटक प्रत्येक माध्यमात त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रीचा आज ५३ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांनी एकत्र येत त्यांना खास सरप्राइज दिलं आहे.
हर्षदा खानविलकरांना Surprise देण्यासाठी या सगळ्या कलाकारांनी खास तयारी केली होती. अभिनेत्री मध्यरात्री कामावरून घरी पोहोचताच त्यांना सुंदर सरप्राइज मिळालं. विदिषा म्हसकर, सुयश टिळक, मृणाल देशपांडे, रेश्मा शिंदे व तिचा नवरा, संजय जाधव, तनिष्का विशे असे सगळे कलाकार त्यांच्या घरी अभिनेत्रीच्या स्वागतासाठी आधीच उपस्थित होते.
हर्षदा यांना दरवाजात पाहताच या सगळ्या कलाकारांनी घराच्या लाइट्स बंद करून मोबाइल टॉर्च ऑन केले आणि त्यांच्यासाठी खास ‘लग जा गले’ हे गाणं गाण्यास सुरुवात केली. अभिनेत्रीच्या घरी यावेळी सुंदर सजावट करण्यात आली होती. यासह हर्षदा यांचे अन्य कलाकार आणि कुटुंबाबरोबरचे खास फोटो यावेळी संपूर्ण घरात लावण्यात आले होते. आपल्या जवळच्या मित्रमंडळींनी केलेली ही सगळी तयारी पाहून अभिनेत्री भारावून गेल्या होत्या. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
हा खास व्हिडीओ सुयश टिळकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. आज संपूर्ण मनोरंजनविश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
हर्षदा यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या त्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. ही मालिका झी मराठीवर दुपारच्या सत्रात प्रसारित केली जाते. ‘लक्ष्मी निवास’मधील सहकलाकारांनी सुद्धा हर्षदा यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय त्या रंगभूमीवर सुद्धा सक्रिय आहेत. ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या नाटकात त्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. त्यांच्यासह या नाटकात अक्षर कोठारी, शर्मिला शिंदे, शंतनू ठवळी, वैष्णवी आंबवणे आणि सुनील बर्वे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत.
