Umesh Kamat-Priya Bapat and Harshada Khanvilkar: हर्षदा खानविलकर सध्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत दिसत आहे. त्यांची लक्ष्मी ही भूमिका प्रेक्षकांना आवडत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, आता हर्षदा खानविलकर त्यांच्या भूमिकेमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. हर्षदा खानविलकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी नाटकात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच, कोणी नवीन निर्माता, दिग्दर्शक तसेच कलाकार असतील आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडीओ पोहोचला तर त्यांचा भूमिकेसाठी विचार केला जावा, असे म्हटले होते.

हर्षदा खानिवलकर यांच्या व्हिडीओवर अनेकांनी त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होईल, असे कमेंट करत लिहिले होते.

हर्षदा खानविलकर यांची २६ वर्षांनंतर इच्छा झाली पूर्ण

हर्षदा खानविलकर यांनी व्हिडीओ शेअर केल्यानंतर अभिनेते सुनील बर्वे यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी हर्षदा यांनी इतक्या मोकळेपणाने त्यांची इच्छा बोलून दाखविली त्याबद्दल कौतुक केले. तसेच त्यांनी १९९८-१९९९ ला त्यांनी एकत्र लग्नाची बेडी या नाटकात काम केल्याची आठवण सांगितली. त्यांनीही नाटकात काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. या दोन्ही लोकप्रिय कलाकारांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत नाटकात काम करण्याबद्दल सांगितले होते. आता हर्षदा खानविलकर व सुनील बर्वे यांची ही इच्छा पूर्ण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता हे नेमकं घडलं कसं, हे जाणून घेऊ…

अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये प्रिया म्हणाली,”सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर आम्ही एक व्हायरल गोष्ट करायचे ठरवले आहे. त्यानंतर ते हर्षदा खानविलकर यांच्या लक्ष्मी निवास मालिकेच्या सेटवर केले. त्यानंतर त्यांनी नाटकाची संहिता त्यांच्या हाती दिली. ते पाहून हर्षदा खानिवलकर यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.

त्यानंतर ते सुनील बर्वे यांच्या घरी गेले. त्यावेळी उमेश म्हणाला, “आम्ही निर्माते म्हणून नाटकाचं स्क्रीप्ट घेऊन पहिल्यांदाच असं मोठ्या कलाकाराकडे चाललोय.” जेव्हा ते सुनील बर्वे यांना भेटले. तेव्हा ते त्यांना म्हणाले, “पुढच्या पीढीचा लेखक आहे, त्याचं पहिलंच नाटक आहे, नव्या पीढीचे निर्माते आहेत या सगळ्या पीढ्यांची गोष्ट तुझ्यासाठी घेऊन आलोय.” त्यावर सुनील बर्वे त्यांना म्हणाले की लगेच आपण याचं वाचन करूया आणि लगेच रिहर्सलला सुरू करूया.

व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळते की, हर्षदा खानविलकर, सुनील बर्वे, प्रिया बापट आणि उमेश कामत हे एकत्र दिसत आहेत. उमेश आणि प्रिया सांगतात की ते नाटकाला हो म्हणाले आहेत. प्रमुख भूमिकेत हर्षदा खानविलकर आणि सुनीव बर्वे दिसणार असल्याचे प्रिया म्हणाली.

त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तुमच्या नाटकाची आतुरतेने वाट पाहत आहोत, अशाही अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. आता या नाटकाचं नाव काय आहे, हे नाटक कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.