Heena Khan angry on Shilpa Shinde fake case on producers : अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने ‘भाबीजी घर पर है’ मालिकेच्या निर्मात्यांवर लावलेले लैंगिक अत्याचाराचे आरोप पूर्णपणे खोटे असल्याची कबुली दिली. एका पॉडकास्टमध्ये, १० वर्षांपूर्वी मानधन अडकल्यामुळे खोटे लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्याचे स्वतः सांगितले. सोशल मीडियावर अभिनेत्री शिल्पा शिंदेविरोधात नाराजी व्यक्त केली असून पुरुष हक्क संघटनांनी अटकेची मागणी केली आहे. या प्रकरणावर अभिनेत्री हिना खानने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. हे सर्व ‘लाजिरवाणे’ असून खरे पीडित तर निर्माते असल्याचे हिना खानने नमूद केले आहे.

अभिनेत्री हिना खान हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत मालिकाविश्वामध्ये घडलेल्या या प्रकारावर आक्रमक प्रतिक्रिया दिली. शिल्पा शिंदेचे नाव न घेता हे नीच आणि मूर्खपणाचे कृत्य असल्याचे म्हणत रोष व्यक्त केला. हिना खानने लिहिले, “सहसा मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलत नाही, पण जेव्हा विषय संवेदनशील असतो, ज्याचा परिणाम समाजावर आणि विशेषतः महिलांवर होतो तेव्हा मला बोलणे गरजेचे वाटते,”

हे अत्यंत लाजिरवाणे अन् धक्कादायक – हिना

पुढे तिने लिहिले आहे की, स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्याचे नाव खराब करून खोटे लैंगिक छळाचे आरोप करणे हे अत्यंत लाजिरवाणे आहे. समाजासमोर व्यक्त होऊन न्याय मागितला पाहिजे, पण हे जे काही आहे ते अत्यंत धक्कादायक आहे. इथे खरा त्रास कोणाला झाला हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे हिना खान म्हणाली आहे.

लोक इतके बेजबाबदार कसे?

पुढे तिने लिहिले की, “एका महिलेने खोट्या आरोपांची कबुली दिल्यानंतरही तिच्या चुकीच्या कृतीचे समर्थन केले जात आहे, हे पाहून मला धक्का बसला आहे. हा एक गंभीर गुन्हा आहे. संबंधित व्यक्तीने खोट्या आरोपांमुळे अपमानामुळे आत्महत्या केली असती किंवा त्याचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झाले असते तर? लोक इतके बेजबाबदार कसे असू शकतात? एक प्रतिष्ठित व्यक्ती, ज्यांना कुटुंब आहे, पत्नी आणि मुलगी आहे. अनेक गाजलेले शो देणाऱ्या मेहनती निर्मात्यांवर ही अशी वेळ आली. अभिनेत्रीने केलेले आरोप निराधार असल्याचे तिने कबूल केले. याचा वापर तिने स्वतःच्या फायद्यासाठी आणि कायद्याचा वापर न करता प्रकरण मिटवण्यासाठी केला आणि त्यानंतरही तोच निर्माता तोच शो त्याच व्यक्तीला देतो,” असे लिहित हिना खानने घडलेल्या प्रकारावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

हिना खान सोशल मीडिया पोस्ट

उद्या पुन्हा तिने हेच आरोप केले तर…

लैंगिक अत्याचाराच्या खोट्या आरोपांनंतरही शिल्पा शिंदे हिने ‘भाबीजी घर पर है’ मालिकेच्या पुढच्या भागामध्ये भूमिका साकारली, यावरून हिना खानने पु्न्हा संधी दिल्याबद्दल मत व्यक्त केले. हिनाने लिहिले की, इतके सगळे घडूनही त्याच निर्मात्याने पुन्हा त्याच अभिनेत्रीला त्याच मालिकेमध्ये संधी दिली. पुन्हा एकदा तिला काम मिळाले, प्रसिद्धी मिळाली आणि तिच्या खोट्या आरोपांनाही जणू मान्यताही मिळाली. उद्या पुन्हा तिने असेच आरोप केले तर? हा विचारच धक्कादायक आहे. हे सगळं पाहून मी खूपच हादरले आहे. शेवटी या सगळ्यामध्ये आपण मात्र मूर्ख ठरतो,” अशा शब्दांत हिना खानने राग व्यक्त केला आहे.