Hema Malini Talks About Her Lovestory With Dharmendra : धर्मेंद्र व हेमा मालिनी हे दोघे बॉलीवूडमधील ९०च्या काळातील लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांत काम करत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे चित्रपटाच्या सेटवरच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण, तुम्हाला माहितीये का हेमा मालिनी यांच्या वडिलांचा या लग्नाला विरोध होता.

हेमा मालिनी व धर्मेंद्र यांनी ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘नसीब’, ‘अलिबाबा और ४० चोर’, ‘अंधा कानून’, ‘राजा जानी’ यांसारख्या अनेक चित्रपटांत एकमेकांबरोबर काम केलंय आणि चित्रपटाच्या सेटवरच काम करत असताना धर्मेंद्र यांना हेमा मालिनी आवडू लागल्या होत्या आणि पुढे हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ‘इंडियन आयडॉल’ सीझन १२च्या सेटवर हेमा मालिनींनी त्यांच्या नात्याला त्यांच्या वडिलांचा विरोध होता याबद्दल सांगितलं.

हेमा मालिनींच्या वडिलांचा होता विरोध

हेमा मालिनी म्हणालेल्या, “माझ्याबरोबर सेटवर माझी आई किंवा माझी मावशी यायची. पण, एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान माझे वडील माझ्याबरोबर आले होते, कारण त्यांना काळजी होती की मी आणि धरमजींनी फार काळ सेटवर एकत्र वेळ घालवू नये. त्यांना माहीत होतं आम्ही मित्र आहोत.”

‘फ्री प्रेस जरनल’च्या वृत्तानुसार हेमा यांनी सांगितलेलं की त्यांचे वडील धर्मेंद्र यांना “तू माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून का जात नाहीस? तुझं लग्न झालेलं आहे, तू माझ्या मुलीशी लग्न करू शकत नाही” असं म्हटलेलं.

हेमा मालिनींबरोबर लग्न करण्याआधी धर्मेंद्र यांचं प्रकाश कौर यांच्याशी लग्न झालेलं होतं आणि त्यांना चार मुलं होती. सनी देओल, बॉबी देओल, अजिता देओल आणि विजेता देओल. त्यांची दोन मुलं सनी व बॉबी देओल बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार हेमा मालिनी म्हणालेल्या की, “मी त्यांच्याशी लग्न केलं, पण त्यांना त्यांच्या पहिल्या कुटुंबापासून कधीच दूर केलं नाही.”