बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी या नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणाऱ्या हेमा यांची लोकप्रियता आजही कायम आहे. हेमा मालिनी या नुकतंच इंडियन आयडॉलच्या १३ व्या पर्वात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आठवणी सांगितल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनी टीव्हीवरील इंडियन आयडॉल या कार्यक्रमात ड्रीम गर्ल विशेष भाग लवकरच सादर होणार आहे. या भागात अनेक स्पर्धक हे सहभागी झाले आहेत. यावेळी ड्रीम गर्लच्या समोर कोलकाताहून आलेल्या सोनाक्षीने किनारा (१९७७) चित्रपटातील ‘नाम गुम जाएगा’ हे गाणे सादर करणार केले. या परफॉर्मन्सनंतर सोनाक्षीच्या आवाजाचे कौतुक करुन हेमा मालिनीने या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळेसच्या आठवणी सांगितल्या.
आणखी वाचा : “मी निवडणूक लढवण्याबद्दलची घोषणा मोदीजी करणार होते पण हेमा मालिनींनी…”, राखी सावंतची खोचक प्रतिक्रिया

त्यावेळी हेमा मालिनी म्हणाल्या, “सोनाक्षी लताजींचे गाणे म्हणणे ही काही सोपी गोष्ट नाही. हे गाणे तू ज्या सहजतेने म्हटलेस, त्याबद्दल मी तुझे कौतुक करते. खूप छान. लता जी आपल्या सर्वांसाठी मा सरस्वती आहेत. हे गाणे गुलझार यांनी कथानकास अनुरुप जरी लिहिले असले तरी ते लताजींसाठीच रचलेले गाणे आहे. मी भाग्यवान आहे की, मला ते गाणे मिळाले. त्यावर परफॉर्म करता आले.”

“हे गाणे १९७७ मध्ये आलेल्या किनारा चित्रपटातील आहे. या चित्रपटात मी एका नेत्रहीन मुलीची भूमिका केली होती. तुझ्या आवाजात हे गाणे ऐकताना मी आज पुन्हा ते गाणे जगले. आम्ही मध्यप्रदेशात या गाण्याचे चित्रीकरण केले होते. आजही जीतू जी, धरम जी आणि माझ्यावर चित्रित झालेल्या या चित्रपटाच्या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत.” असे हेमा मालिनी यांनी सांगितले.

यानंतर आदित्य नारायणने हेमा मालिनी यांना एक प्रश्न विचारला. हे गाणे जिकडे चित्रित झाले होते, तिथे कोणते झपाटलेले घर होते का? त्यावर हसत हसत हेमा मालिनी म्हणाली, “या गाण्याचे चित्रीकरण मध्यप्रदेशात झाले होते. गुलझार साहब यांनी ती जागा शोधली होती. त्याकाळी, आजच्यासारखी मोठमोठी हॉटेल्स नव्हती. अशाच एखाद्या मोठ्या काळोख्या बंगल्यात आम्ही सर्व एकत्र राहायचो. या बंगल्याच्या जवळ एक तलाव होता.”

आणखी वाचा : “महिलांच्या छोट्या बॅगेत नेमकं काय असतं?” बिग बींना पडला प्रश्न, ‘ड्रीम गर्ल’ने सांगितले ‘सिक्रेट’

“रात्री अनेक चित्रविचित्र आवाज ऐकायला यायचे. त्यात जीतू जी आणि गुलझार सर आम्हा सगळ्यांच्या खूप खोड्या काढायचे. मला सकाळी खाता यावेत, म्हणून रात्री ५-६ बदाम भिजवलेले असायचे. मी जेव्हा सकाळी बदाम घ्यायला जायचे, तेव्हा ते आधीच कुणी तरी खाऊन टाकलेले असायचे आणि मला ते चिडवायचे की, भूत आले होते आणि त्याने बदाम खाल्ले. सेटवर आम्ही अशी खूप मस्ती करायचो.” असा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hema malini share story behind lata mangeshkar naam goom jayega song in indian idol nrp
First published on: 08-12-2022 at 14:55 IST