मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर हेमांगीने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठीबरोबर हेमांगीने हिंदी मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सोशल मीडियावर हेमांगी मोठ्या प्रमाणत सक्रिय असते निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान तिच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नुकताच झी चॅनलचा झी रिश्ते अवॉर्डस २०२४ कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यामध्ये हिंदी मालिकांमधील अनेक कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी हेमांगी कवीला ‘कैसे मुझे तुम मिल गयी’ या हिंदी मालिकेतल्या भवानी चिटणीस या व्यक्तीरेखेसाठी सर्वोत्कृष्ट आई हा पुरस्कार मिळाला. हेमांगीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

हेमांगीने आपल्या इन्स्टाग्रामवर पुरस्कार सोहळ्यातील तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओबरोबर तिने लिहिले “काल #मातृभाषदिन होता आणि कालच मला झी रिश्ते अवॅार्डस् २०२४ मध्ये माझ्या ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या हिंदी मालिकेतल्या ‘भवानी चिटणीस’ या व्यक्तीरेखेसाठी ‘Best Maa’ चा पुरस्कार मिळाला!माझ्यासाठी हा एक सुखद धक्काच होता. रंगमंच्यावर गेल्यावर कळेना कुठल्या भाषेत माझ्या भावना व्यक्त कराव्या कारण समोर बसलेले बहुतांश लोक हिंदी भाषिक होते. मला हे माहीत असतानाही माझ्या तोंडून माझी मातृभाषा आली. ऐकणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मी नम्रपणे माफी मागून मराठीत बोलू लागले आणि जेव्हा समोरून ‘जय महाराष्ट्र’ ऐकू आलं तेव्हा तर उर भरून आला, बळ मिळालं!”

तिने पुढे लिहिले. “त्यानंतर ज्या प्रकारे @arjunbijlani आणि @haarshlimbachiyaa30 ने मराठीत बोलल्यावर प्रोत्साहन दिलं तेव्हा तर आहाहा खूपच भारी वाटलं! रंगमंच्यावरून खाली आल्यानंतर बऱ्याच हिंदी भाषिक कलाकारांनी मी मराठीत व्यक्त झाल्याचं कौतुक केलं! आपलं आपल्या भाषेवर अतोनात प्रेम असलं की आपण दुसऱ्या भाषेवर ही तितकंच प्रेम करतो! आपल्या मराठी भाषेला मिळालेलं प्रेम पाहून कायच्या काय भारी वाटतंय! जय महाराष्ट्र!” हेमांगीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा- १३३ कोटींची कंपनी १५ कोटींना विकत घ्यायचा ‘लेन्सकार्ट’च्या सीइओचा प्रस्ताव; ‘शार्क टँक इंडिया’च्या इतिहासातील भन्नाट डील

हेमांगीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास आत्तापर्यंत तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. अवघाचि संसार’, ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘वादळवाट’, ‘लेक माझी दुर्गा’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकांमधील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. तसेच सुश्मिता सेनच्या ताली वेबसीरिजमध्येही झळकली आहे. सध्या हेमांगी झी टिव्हीवरील ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या हिंदी मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती भवानी चिटणीस हे मराठी पात्र साकारत आहे.