Zee Marathi Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Television Premiere : २०२६ हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी खूपच खास ठरतंय. यंदाच्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा हेमंत ढोमेचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मराठी माध्यमातील शाळेच्या अस्मितेला ठाम आवाज देणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २७ कोटींहून अधिक कमाई करत अभिमानास्पद यश संपादन केलं आहे. या चित्रपटाने थिएटरमध्येही ५० यशस्वी दिवस पूर्ण केले आहेत. आता हा सुपरहिट सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी ZEE5 या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची घोषणा करण्यात आली आहे. झी मराठी वाहिनीने प्रोमो शेअर करत ही माहिती प्रेक्षकांना दिली आहे.

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा सिनेमा आता प्रेक्षकांना घरबसल्या टीव्हीवर पाहता येणार आहे. या चित्रपटाचा टेलिव्हिजन प्रीमियर २१ जूनला होईल. रविवारी २१ जूनला सायंकाळी ७ वाजता हा सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना ‘झी मराठी’ वाहिनीवर पाहता येणार आहे.

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं, तर या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमेने केलं असून, निर्मितीची धुरा क्षिती जोगने सांभाळली आहे. तर, या सिनेमाचे सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.

‘क्रांतिज्योती विद्यालय -मराठी माध्यम’ला मिळालेल्या प्रचंड प्रेमाबद्दल सांगताना दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतो, “हा चित्रपट प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारला, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. २७ कोटींचा टप्पा गाठणं ही संपूर्ण टीमची मेहनत आणि प्रेक्षकांच्या प्रेमाची पावती आहे. कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आणि पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याचे मनापासून आभार. तसेच रसिक प्रेक्षकांचे ऋण शब्दांत मांडता येणार नाही. याच प्रेमामुळे आम्हाला अधिक प्रामाणिक, आशयघन चित्रपट घेऊन येण्याची ऊर्जा मिळते.”