Maharashtrachi Hasyajatra Actor Shares His Casting Story : टीव्हीवरील काही लोकप्रिय शोंपैकी एक म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो. गेली अनेक वर्षं हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, अरुण कदम, प्रभाकर मोरे, रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परबसह या शोमध्ये आणखी एक विनोदी अभिनेता हसवण्याचं काम करतो. त्याच अभिनेत्यानं त्याच्या हास्यजत्रामधील कास्टिंगचा किस्सा शेअर केला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोनं अनेक नवीन चेहऱ्यांना नवीन संधी आणि ओळख मिळवून दिली. अशा नव्या चेहऱ्यांपैकी एक म्हणजे हेमंत पाटील. खानदेशी बोली आणि अनोख्या विनोदी शैलीनं त्यानं महाराष्ट्राला हसवण्याचं काम केलंय. याच शोमध्ये हेमंतची निवड कशी झाली? त्याबद्दल त्यानं एका मुलाखतीत खास किस्सा शेअर केला आहे.
हेमंत म्हणाला, “माझा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा प्रवास २००८-०९ मध्येच सुरू झाला. एका दैनिक वृत्तपत्राच्या स्पर्धेत मी सहभाग घेतला होता आणि तिथे सचिन गोस्वामी परीक्षक होते. त्यावेळी मी विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही नाटकांत काम करीत होतो. दोन्ही नाटकांसाठी मला बक्षीस मिळालं. ते बक्षीस घ्यायला मी जात होतो. तेवढ्यात त्यांनी मला थांबवलं आणि ते रागावलेही. ‘तू अतिशय आगाऊ नट आहेस. तू कुणाला बोलू देत नाहीस; पण याला मी माझ्या एका व्यावसायिक नाटकात घेत आहे’, असं त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं.”
‘मोठी रेष’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तो पुढे म्हणाला, “त्यानंतर मला पुढच्या वर्षी एक फोन आला आणि मी त्यांच्या नाटकात काम करीत होतो. त्यात भाऊ कदम, आनंद अभ्यंकर, सुरेखा पुणेकर यांच्यासारखी मंडळी होती. त्याचे काही प्रयोग झाले आणि मग ते नाटक थांबलं. पुढे मी माझ्या कामात व्यग्र होतो.”
त्यानंतर हेमंतनं सांगितलं, “२०२२ मध्ये कोरोनानंतरच्या काळात मला पुन्हा त्यांचा फोन आला. तेव्हा त्यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार का? म्हणून विचारण्यासाठी कॉल केला; पण मला तेव्हा विश्वास बसत नव्हता. मी त्यांच्या फोनची वाटच बघत होतो. नंतर मला पुन्हा कॉल आला आणि त्यांनी मला माझ्या शूटिंगच्या वेळ आणि पर डे याबद्दल वगैरे सगळं सांगितलं आणि तिथून माझा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा प्रवास सुरू झाला. मला वाटलं की, एखाद शेड्युल असेल; पण ती मालिका अजून सुरूच आहे.”
