Shilpa Shinde Hina Khan Controversy : अभिनेत्री शिल्पा शिंदेने ‘भाबीजी घर पर है’ मालिकेच्या निर्मात्यांवर खोटे लैंगिक छळाचे आरोप केल्याचे कबूल केले. यामुळे अभिनेत्री हिना खानने संताप व्यक्त केला आहे. पैशांसाठी आणि वैयक्तिक फायद्यासाठी असे लैंगिक छळाचे आरोप करणे हे संतापजनक असून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी तिने केली आहे. यानंतर शिल्पा शिंदे आणि हिना खान यांच्यामध्ये वाद रंगला आहे. दोघींमध्ये सोशल मीडियावर जुंपली असून यावेळी तर देशाचे पंतप्रधान व राष्ट्रपती यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने ‘भाबीजी घर पर है’ मालिकेतून अचानक एक्झिट घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. यावेळी तिने निर्माते संजय कोहली यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत एफआयआर दाखल केली होती. मात्र, आता सर्व आरोप खोटे असून तीन महिन्यांचे मानधन मिळाल्याचे शिल्पाने सांगितले. ९ वर्षांनंतर तिने हा खुलासा केल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

खोट्या आरोपांमुळे हिना खानचा संताप

यावरून हिना खान हिने हे वागणे लज्जास्पद असून निर्मात्यांनी आत्महत्या केली असती तर याची जबाबदारी कोणी घेतली असती? किती बेजबाबदार वागणे आहे हे, असे म्हणत जोरदार टीका केली. यावरून आता दोघींमध्ये पुन्हा बिग बॉससारखा वाद निर्माण झाला आहे.

माझ्या नादाला लागू नका – शिल्पा शिंदे

हिना खानवर पलटवार करत शिल्पा शिंदे म्हणाली की, चालत्या गाडीमध्ये चढणे बंद करा. मी बोलायला सुरुवात केली तर तुम्हाला अवघड जाईल. माझ्या नावावरून प्रसिद्धी मिळवणे कधी थांबवणार माहिती नाही. चर्चेत राहण्यासाठी तुमचा आजार आणि तुमचे वारलेले नातेवाईक हे मुद्दे आहेत. घडून गेलेल्या गोष्टींवर मला बोलायला लावू नका, जर मी लोकांबद्दल पुरावे दिले तर तुम्हाला त्या वारलेल्या लोकांचासुद्धा राग येईल, त्यामुळे माझ्या नादाला लागू नका. ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही त्यावर भुंकणे बंद करा. त्यावेळेस माझी साथ दिली असती तर आता अशी बोलण्याची वेळ नसती आली, अशा शब्दांत शिल्पा शिंदेने पलटवार केला आहे.

सर्व आरोपींची सुटका करा, कारण…

हिना खानचे नाव न घेता शिल्पाने आक्रमक प्रत्युत्तर दिले. पण, यावर वाद न थांबता हिना खानने पुन्हा एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने देशाचे पंतप्रधान आणि देशाच्या राष्ट्रपतींना खास विनंती केली आहे. हिना खान हिने स्टोरीमध्ये लिहिले आहे की, माननीय पंतप्रधान, माननीय राष्ट्रपती व माननीय न्याय मंत्री, तुम्ही गुन्हा कबूल केलेल्या सर्व आरोपींची सुटका करून टाका, कारण त्यांच्यामध्ये हिंमत आहे आणि ते आता खरे बोलत आहेत. गुन्हा घडत असताना त्यांना कोणी पाठिंबा दिला नाही म्हणून आता त्यांची सुटका करा, असे लिहित हिना खानने शिल्पा शिंदेचे नाव न घेता तिला टोला लगावला आहे.

हिना खान पोस्ट

शिल्पा शिंदे व हिना खानच्या या वादामध्ये त्यांनी आता थेट राष्ट्रपती व पंतप्रधानांचे नाव घेतले आहे; यावरून सोशल मीडियावर दोघींमध्ये पुन्हा बिग बॉस सुरू झाल्याचे नेटकरी म्हणाले आहेत.