Himanshi Khurana Asim Riyaz Breakup Religion Controversy: ‘बिग बॉस’फेम अभिनेत्री हिमांशी खुरानाने तिच्या आधीच्या रिलेशनशिपबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. आधीच्या नात्यामध्ये तिच्यावर दबाव आणल्यामुळे हिमांशी इतर धर्म स्वीकारण्याचा विचार करीत होती. तसेच तिच्या श्रद्धा आणि धार्मिक विधींना विरोध करण्यात आल्याचं हिमांशीने सांगितले आहे. हिमांशी खुरानाने थेट तिच्या एक्स बॉयफ्रेंडचे नाव घेतले नसले तरी त्या दोघांमधील धार्मिक आणि आध्यात्मिक यांवरील मतभेदांबद्दल मत व्यक्त केले आहे.
हिमांशी खुराना आणि असीम रियाज हे काही वर्षांपूर्वी एकमेकांना डेट करीत होते. ब्रेकअपच्या तीन वर्षांनंतर हिमांशीने तिच्यावर धर्माबाबत दबाव असल्याचा खुलासा केला आहे. पारस छाब्राच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने एक्स बॉयफ्रेंड असीमच्या नावाचा उल्लेख न करता, तो तिला त्याच्या धर्माबाबत सर्व चांगल्या गोष्टी सांगत असायचा आणि तिने त्या समजून घेऊन स्वीकाराव्यात, अशी तिच्या एक्स बॉयफ्रेंडची इच्छा होती.
पण ते मला मान्य नव्हतं – हिमांशी
हिमांशी खुराना म्हणाली, “तो मला त्याच्या धर्मातील चांगल्या गोष्टी सांगायचा. त्यामध्ये काही चूक नव्हतं. प्रत्येक जण आपापल्या धर्माबद्दल चांगलं बोलत असतो. मी त्या गोष्टी समजून घ्याव्यात आणि स्वीकाराव्यात, अशी त्याची इच्छा होती; पण ते मला मान्य नव्हतं. त्यानं माझ्याशी कधीही गैरवर्तन केलं नाही; पण मला स्वतःला असं काही करायचं नव्हतं, हा माझा वैयक्तिक निर्णय होता.”
या सर्व घटनांचा तिच्या मनावर आणि श्रद्धेवर परिणाम झाल्याचे तिने सांगितले. यापुढे तिला तिच्या धार्मिक विधींचं पालन करता येणार नाही, असं सांगण्यात आलं होतं. ती म्हणाली, “जेव्हा मला अशी शक्यता वाटली की, यापुढे मला माझ्या धर्माचं पालन करता येणार नाही. तेव्हा माझ्या मनामध्ये चारधाम यात्रा आणि इतर धार्मिक स्थळांना भेट देण्याचा विचार आला. कारण- त्यानंतर मला या सर्व ठिकाणी जाता येईल की नाही, याची शंका होती. मला असं वाटत होतं की, मी माझ्या देवाचा विश्वासघात करतेय आणि त्यांचा कायमचा निरोप घेतेय.”
आपल्या श्रद्धांचा विश्वासघात केल्यासारखं – हिमांशी
बालपणापासून आपल्या मनात रुजलेल्या श्रद्धा सहजपणे बाजूला ठेवता येत नाहीत, असे मत हिमांशीने व्यक्त केले. दुसऱ्या धर्मातील प्रथा स्वीकारताना आपल्याला आपल्या श्रद्धांचा विश्वासघात केल्यासारखं वाटू शकतं, असे तिने सांगितले. हिमांशी म्हणाली, “जे आधीपासूनच माझ्यामध्ये आहे. मी ते कसं काढून टाकणार? हे शक्य नाही. कारण- आपण लहानपणापासून या गोष्टींचं पालन करीत आलो आहोत. काहीही असो, ते आपल्या आत असतंच.”
पुढे ती म्हणाली, “कोणता धर्म योग्य किंवा अयोग्य आहे, हा मुद्दाच नाहीये. लहानपणापासून आपल्यावर जे संस्कार झाले आहेत आणि ज्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग झाल्या आहेत, त्या श्रद्धा सोडण्याबद्दल मला अडचण होती. या सर्व परिस्थितीमध्ये माझ्या मनात प्रश्न यायचा की, ‘माझ्या निधनांनतर माझ्यावर अंत्यसंस्कार केले जातील की मला दफन केलं जाईल?’ प्रत्येकाला निवड करण्याचा अधिकार आहे आणि ती निवड त्यानं स्वतः केलेली असावी.”
हिमांशी खुराना व असीम रियाज यांचे बिग बॉसमध्ये जुळलं प्रेम
‘बिग बॉस १३’मध्ये अभिनेत्री हिमांशी खुराना व असीम रियाज यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यांच्या जोडीला चाहत्यांचीही पसंती मिळाली होती. मात्र, चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर डिसेंबर २०२३ त्यांचे ब्रेकअप झाले. यावेळी त्यांनी वेगवेगळे धर्म असल्यामुळे वेगळे होत असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी हिमांशी म्हणालेली, “आम्ही आमच्या वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धांसाठी आमच्या प्रेमाचा त्याग करीत आहोत.” यावर असीमनेही दुजोरा देत, धार्मिक श्रद्धांमुळेच परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.
