टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान अनेक दिवसांपासून स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. परंतु, कर्करोगाशी झुंजत असतानाही अभिनेत्रीने तिच्या कामाकडे दुर्लक्ष केलेलं नाही. आरोग्यच्या अनेक समस्यांना सामोरं जाताना ती अभिनय क्षेत्रातही सक्रिय आहे. अशा वेळी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हिनाच्या या धाडसाचं कौतुक करीत, ती लवकर या आजारातून मुक्त व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. तर, अनेक जण यातून ती लवकर बरी व्हावी म्हणून तिला पाठिंबा देत आहेत.

या आजारपणात, हिनासाठी तिचं कुटुंब व प्रियकर रॉकी जैस्वाल ठामपणे तिच्यामागे उभे आहेत. कर्करोगामुळे होणाऱ्या वैद्यकीय उपचारादरम्यान हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी कायम तिच्याबरोबर असल्याचं दिसतं. त्यामुळे हीना तिच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या माणसांसाठी कायम सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करीत त्यांचे आभार मानत असते. अशातच आता अभिनेत्रीनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये हिना व रॉकी यांचे काही गोड फोटो पाहायला मिळत आहेत. तर या फोटोंमागे ‘बेटर टुगेदर’ असं लिहिलेलं आहे. हिनाने या पोस्टखाली ‘हमदर्द’ अशी कॅप्शन देत रॉकीचे आभार मानले आहेत. रॉकीनंही या फोटोखाली कमेंट केली आहे. हिनानं शेअर केलेल्या या फोटोखाली तिच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्याचे दिसत आहेत. एकानं, “तुम्ही दोघं लवकर लग्न करा. तिच्या सगळ्या इच्छा तू पू्र्ण कर”, असं म्हटलं आहे. दुसऱ्यानं, ‘तुम्ही कायम आनंदात राहा’, असं म्हटलं आहे. एका चाहत्यानं “तुम्ही दोघं माझी आवडती जोडी आहात”, असं म्हणत कमेंट केली आहे.

हिना-रॉकी यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगायचं झालं तर, हिनानं ‘यह रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यामध्ये तिनं अक्षराची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं. त्यामुळे आजही अनेक जण तिला अक्षरा म्हणूनही ओळखतात. तर हिनाचा प्रियकर रॉकी त्यावेळी या मालिकेचा प्रोड्युसर होता. दोघांची यादरम्यानच भेट झाली आणि पुढे मालिकेच्या सेटवर त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिनाच्या कठीण काळात रॉकी कायम तिच्याबरोबर असल्याचे दिसले. तर ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कार्यक्रमात हिना रॉकीबद्दल बोलताना म्हणाली, “रॉकीनं मला या संपूर्ण प्रवासात कायम पाठिंबा दिला आहे. कर्करोगामुळे मला अनेक शस्त्रक्रियांमधून जावं लागलं. त्यावेळी रॉकी माझ्याबरोबर होता. तर शस्त्रक्रियांमुळे झालेल्या जखमांवर रॉकी मलम लावत असे, मला त्रास होत असेल, तर तो माझी काळजी घेतो. या सगळ्यामुळे त्यालाही त्रास होतो. तो बाथरूममध्ये जाऊन रडतो; पण माझ्यासमोर कधीही रडत नाही.”