Actress Angry On New Casting Trend : मनोरंजन क्षेत्रातल्या अनेक कलाकारांना विविध पद्धतींनी काम मिळवावं लागत आहे. याआधी कलाकारांची त्यांचे अभिनय कौशल्य पाहून एखाद्या भूमिकेसाठी निवड केली जात होती. त्यात मध्यंतरी सोशल मीडियावरील फॉलोअर्स पाहून कामे दिली जात होती. मात्र, आता तर कास्टिंगची एक नवीन पद्धत आली आहे आणि त्यावर एका हिंदी टीव्ही अभिनेत्रीने थेट व्हिडीओच शेअर केला आहे.
टीव्ही अभिनेत्री फलक नाज हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्री अनेकदा इंडस्ट्रीतले कलाकार आणि कामाची पद्धत यांबद्दल स्पष्टपणे तिचे मत व्यक्त करत असते. अशातच नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर करीत इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या कास्टिंगच्या नवीन ट्रेंडबद्दल सांगितले आहे.
फलक म्हणते, “हा व्हिडीओ त्यांच्यासाठी आहे, जे अभिनय क्षेत्रात येऊ इच्छित आहेत. त्यांच्यासाठी खरं तर ही एक चमत्कारिक गोष्ट आहे. आधी तुमची तुमचा अभिनय पाहून निवड केली जात होती. त्यानंतर मग फॉलोअर्स पाहून कास्टिंग केलं जाऊ लागलं. पण, आता एक ट्रेंड सुरू झाला आहे आणि तो म्हणजे जन्मकुंडली बघून काम दिलं जात आहे. तुमच्या जन्मकुंडलीवरून तुम्हाला ते काम दिलं जाईल किंवा दिलं जाणार नाही.”
“इतके काम करूनही आता ही वेळ…”
पुढे तिने स्वत:चा अनुभव शेअर करीत म्हटलं, “मला एका प्रॉडक्शन कंपनीकडून कॉल आला. त्यांचं नाव मी आता घेत नाही. त्यांनी आताच हे सगळं सुरू केलं आहे. त्यांनी मला भूमिका, मालिकेबद्दल माहिती दिली. त्यावर मी म्हटलं ठीक आहे. साधारणपणे कलाकारांना लूक टेस्टसाठी बोलावलं जातं किंवा एखादं ऑडिशन घेतलं जातं; पण माझ्याकडून माझ्या जन्माची वेळ आणि ठिकाण मागितलं गेलं. त्यावर मी त्यांना हे कशासाठी हवं आहे हे विचारलं. एक मोठा निर्माता आहे, जे असे प्रकार करतात. साहजिकच मी त्याचं नाव घेणार नाही. ते जन्मकुंडली बघून काम देतात. ठीक आहे. मला यात पडायचं नाही. गेली १४-१५ वर्षं मी इंडस्ट्रीत काम करते आहे. मला माझ्या टॅलेंटवरच काम मिळालं आहे. मला माझी जन्मकुंडली बघून काम मिळालेलं नाहीय. मी तर त्यांना नाहीच म्हणाले. कारण- मला यावर विश्वास नाही. माझी जन्मकुंडली कुणाशीच जुळणार नाही. मी तेव्हा त्यांना जन्मकुंडली तर दिली; पण मला खूपच राग येत आहे. इतकं काम करूनही आता ही वेळ आली आहे की, जन्मकुंडली बघून काम मिळेल? मला वाटतं हेच एकमेव कारण आहे, ज्यामुळे अनेक दिग्गज आणि ज्येष्ठ कलाकार घरी बसून आहेत. आम्हाला हे मान्यच नाही.”
“तुम्ही एक निर्माते आहात, देव नाही”
पुढे ती म्हणाली, “कलाकार असल्यामुळे आम्ही आमच्यावर खूप मेहनत घेतली आहे. जीव ओतून काम मिळवलं आहे. कुंडली बघून लग्न टिकत नाहीयेत, तुम्ही एक शो चालवणार आहात? आणि हा असा कुठला शो आहे, जो कुंडली बघून पूर्ण जगात हिट ठरला आहे. या विचारानं खूप चिडचिड होत आहे. मला या मूर्खपणात सहभागी व्हायचं नाही. तुम्ही एक निर्माते आहात, तुम्ही देव नाही आहात. माझं काम मला मिळणारच आहे आणि ते काम मला माझा अभिनय बघूनच मिळणार आहे. मला हे अजिबातच मान्य नाही की, तुम्ही माझी जन्मकुंडली बघून काम द्याल. माझी आता सर्वांनाच विनंती आहे की, जन्मकुंडली बघून काम देणाऱ्यांनी मला आता कॉलसुद्धा करू नये. मी एकदा हे दिलं आहे; पण मला तेव्हापासून खूप राग येत आहे. आधी आम्ही लूक टेस्ट द्यायचो. ऑडिशन द्यायचो, उत्तराची वाट बघत होतो. त्या प्रक्रियेची आणि वेळेची आम्ही वाट बघायचो. काम नसताना ऑडिशन देऊन वाट बघणं हेच कलाकार म्हणून आम्ही करत होतो; पण आता जन्मकुंडलीचा विचार सतत डोक्यात सुरू आहे आणि हा शुद्ध मूर्खपणा आहे. जे जे अभिनय क्षेत्रात येऊ इच्छित आहेत, त्यांनी जन्म वेळ आणि ठिकाण प्रॉडक्शन कंपनीला पाठवा. बाकी अभिनय वगैरे येण्याची गरज नाही. कुंडली जुळली, तर काम मिळेल. मीपण आता तेच सुरू करणार आहे.”
दरम्यान, फलकच्या या व्हिडीओवर अनेक सहकलाकार आणि चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही कलाकारांनी तिच्या या माहितीला दुजोरा दिला आहे; तर काही लोक यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत.
