Apurva gore and Anshuman Joshi Love Story: गेल्या काही दिवसांत मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली. त्यामध्ये रेवती लेले, अपूर्वा नेमळेकर, अक्षया हिंदळकर-विशाल निकम अशा काही कलाकारांनी लग्नगाठ बांधली. नुकतीच रुमानी खरे व स्तवन शिंदे हेदेखील लग्नबंधनात अडकले. तसेच, ‘आई कुठे काय करते’फेम अपूर्वा गोरेनेदेखील अभिनेता अंशुमन जोशीबरोबर लग्नगाठ बांधली.

अपूर्वा व अंशुमनच्या लग्नातील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या पारंपरिक लूकची चर्चा होत आहे. तसेच, काही फोटोंमध्ये अपूर्वा भावूक झाल्याचे दिसत आहे. या फोटोंमधून त्यांच्या लग्नातील खास क्षण चाहत्यांना पाहायला मिळत आहेत. त्यांच्यावर चाहते भरभरून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

“तेव्हा खरं तर तिला समजलं होतं की…”

आता स्क्रीनरायटर व दिग्दर्शक मिताली जोशीने अपूर्वा व अंशुमनचे लग्न झाल्यानंतर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने लिहिले, “काय करू कळत नाहीये हे जेव्हा ती म्हणाली, तेव्हा खरं तर तिला समजलं होतं की, मन रुतून बसलं आहे. दोघं खूप गप्पा मारत होते आणि आयुष्य एकत्र घालवायचं ठरवलं, तर मजा येणार आहे हे त्यांना आतून पूर्ण पटलं होतं. पण, मग हे असं आतून काहीतरी वाटतंय म्हणून आयुष्य एकत्र घालवायचा निर्णय घेऊ नये, असे म्हणतात. अगदी जात-पात नाही तरी आर्थिक स्थैर्य, सामाजिक, धार्मिक धारणा, विचार, हे सगळे सोपे प्रश्न घेऊन पेपर अवघड असतो म्हणत वेळ घेऊ लागले.

मितालीने पुढे लिहिले, “नको-नको, नाही जमायचं म्हणत चर्वित चर्वण सुरू ठेवलं. पण, मग फ़ोनवर त्याचं नाव बघून जगातला सगळा बावळटपणा एकवटून जे हसू यायचं त्याचं काय कराल? मला तू खूप आवडली आहेस हे सांगायला पावसात भिजत रात्री जेव्हा तो घराखाली भिजत उभा होता. तेव्हा जी धडधड होत होती, त्याचं काय कराल? नको नको म्हणत झोपायच्या आधी पेंग रेंगाळत ठेवायचे दोघं, तेव्हा कुठे जायचे सामाजिक, आर्थिक प्रश्न? घाव बसत होतेच; पण एक गाणं पुरेसं पडलं शेवटचा घाव बसायला आणि शहाणपणा गळून गेला.”

“डोळे उघडतात तेव्हा समोर शांतपणे…”

पुढे तिने असेही लिहिले, “न ठरवता ठरतं लग्न, स्वर्गात तयार होतात का नाही माहीत नाही; पण सुरुवातीलाच आतून आपला माणूस कोण आहे हे कळून चुकतं. लव्ह अॅट फर्स्ट साईट बहुतेक असतं. चित्रपट, कादंबऱ्या, कविता यामध्ये दाखवलेलं खरं होतं आणि मग सगळं नीट होतं. जाग यायच्या आत त्याचा किंवा तिचा मेसेज आला आहे की नाही बघायला फ़ोन शोधणारे हात एकमेकांमध्ये सुस्तावतात आणि डोळे उघडतात तेव्हा समोर शांतपणे झोपलेली आपली व्यक्ती बघून सूर्य का उगवलाय? आज याचं कारण सापडतं आणि रोज सापडत जातं.”

शेवटी तिने अपूर्वा व अंशुमनला टॅग करीत लिहिले, ‘इडा पिडा टळो. कोणाची दृष्ट न लागो गं बाई’, असे लिहिले. मितालीने तिच्या भावना व्यक्त करताना त्यांच्या लग्नातील एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

मितालीच्या या पोस्टवर अपूर्वाने लिहिले, “मिताली लव्ह यू. प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू. याआधीही मी म्हटल्याप्रमाणे तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.” तसेच, अभिनेत्री शिवानी सोनार, नंदिता पाटकर या अभिनेत्रींनीदेखील कमेंट्स करत कौतुक केले आहे.