स्टार प्रवाहच्या ‘आनंदी’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर आनंदी आणि युगंधर यांचं लग्न पार पडलं. मात्र, आनंदीचा सासरी सून म्हणून गृहप्रवेश झाला नाही. आता ‘आनंदी’च्या आयुष्यात शिल्पा निंबाळकर नावाचं वादळ येणार आहे. ही भूमिका कोण साकारणार जाणून घेऊयात…
‘आनंदी’ मालिकेत शिल्पा निंबाळकरची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा शहा साकारणार आहेत. त्या महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हृता दुर्गुळेच्या सासुबाई आहेत. ‘दुर्वा’ मालिकेनंतर जवळपास १३ वर्षांनंतर त्या ‘स्टार प्रवाह’बरोबर काम करत आहेत.
या भूमिकेविषयी सांगताना त्या म्हणाल्या, “मी ३५ वर्षे अभिनय क्षेत्रात काम करतेय. या काळात जवळपास ८० टक्के भूमिका मी खलनायिकेच्या साकारल्या आहेत. या मालिकेतल्या शिल्पाचा निंबाळकर कुटुंबात दरारा आहे. शिल्पा ही युगंधरची मोठी बहीण. तिने प्रेमासाठी एका गरीब मुलाशी लग्न केलं. पण लग्नानंतर मूल होत नसल्यामुळे तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिलं. त्या वेदनादायक अनुभवामुळे तिच्या मनात गरीब लोकांविषयी तीव्र द्वेष आणि अविश्वास निर्माण झाला. तिचा असा विश्वास आहे की, गरीब लोक अनेकदा पैशासाठी इतरांचा फायदा घेतात आणि त्यांच्यावर सहज विश्वास ठेवता येत नाही.”
पण दुसऱ्या बाजूला, शिल्पा यांचं युगंधरवरील प्रेम मात्र निरपेक्ष आहे. आपल्या भावासाठी ती स्वतःचा जीवही देऊ शकते. जेव्हा शिल्पाला युगंधर आणि आनंदीच्या लग्नाबद्दल कळेत तेव्हा मात्र नवं नाट्य रंगणार यात शंका नाही. ही मालिका आता स्टार प्रवाहवर रात्री ९:३० वाजता प्रसारित केली जाते.
दरम्यान, ‘आनंदी’ मालिकेत अभिनेत्री जाई खांडेकर आणि अभिनेते समीर धर्माधिकारी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. तसेच यामध्ये खलनायकाची भूमिका अभिनेता विकास पाटील साकारत आहे. विद्याधर निंबाळकर असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. युगंधरने कष्टाने कमावलेल्या संपत्तीवर त्याची नजर आहे. अतिशय उर्मट, असंवेदनशील, अय्याशी स्वभावाच्या असलेल्या विद्याधरला पैशांचा प्रचंड माज आहे. बाई आणि बाटलीच्या नादापायी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. अशा पद्धतीचं पात्र विकासने आजवर साकारलेलं नाही. त्यामुळे विद्याधर साकारणं विकाससाठी नवं आव्हान होतं.
