Pranit More Apology Video: प्रणित मोरेच्या शोमधील ‘३७० रुपयांची बिर्याणी’ आणि ‘मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर विनोद’ हे दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओवरून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. ३७० रुपयांची बिर्याणी वसूल करण्याचं विधान करणाऱ्या हिमांशू जांगरा नावाच्या तरुणाला नोकरी गमवावी लागली आहे. तर दुसरीकडे मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्ट्सबद्दल विनोद करणाऱ्या सेजल पवार या डॉक्टर तरुणीबद्दल केईएम रुग्णालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण वादावर पहिल्यांदाच प्रणित मोरेने समोर येऊन माफी मागितली आहे.

प्रणित मोरेने त्याचं इन्स्टाग्राम का दिसत नव्हतं तेही सांगितलं. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मेटाने प्रणितचं इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड केलं होतं. लोकांचा संताप, नाराजी मान्य आहे, आपल्याकडून चूक झाली आणि भविष्यात असं घडणार नाही, असं म्हणत प्रणित मोरेने सर्वांची माफी मागितली आहे. त्याचबरोबर घडलेल्या प्रसंगातून धडा शिकलोय, पण एक संधी द्या, चांगला माणूस बनून दाखवेन, अशी विनंतीही त्याने सर्वांना केली आहे.

माझी खूप मोठी चूक झाली – प्रणित मोरे

“हॅलो, मला हे बऱ्याच दिवसांपासून बोलायचं होतं, पण माझं इन्स्टाग्राम सस्पेंड झालं होतं. तुम्ही सर्वांनी माझा क्राउड वर्कचा व्हिडीओ पाहिला असेल, त्या व्हिडीओवरून लोक माझा द्वेष करत आहेत आणि मी त्या द्वेषास पात्र आहे, असं मला वाटतं. कारण शोमध्ये तो मुलगा बऱ्याच आक्षेपार्ह गोष्टी बोलला, पण सर्वजण त्याच्यावर हसत होते त्यामुळे मीही वाहवत गेलो, ही माझी खूप मोठी चूक झाली. मी त्याला तिथे थांबवू शकलो असतो, मी ठाम भूमिका घेऊ शकलो असतो पण मी ते करू शकलो नाही. मी त्याला प्लॅटफॉर्म दिला, त्यामुळे ही गोष्ट इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली. या व्हिडीओमुळे जे दुखावलेत, त्या सर्वांची मी माफी मागतो. माझ्याविरोधात जी कायदेशीर कारवाई होत आहे, त्यासाठी मी अधिकाऱ्यांना सहकार्य करतोय. पण मी सर्वांना एकच विनंती करतोय, प्लीज मला एक संधी द्या मी एक चांगला माणूस बनून दाखवेन. माझ्यासाठीही हा एक धडा होता. मी स्वतःवर काम करतोय, माझ्या कंटेंटवर काम करतोय आणि ते तुम्हाला भविष्यात माझ्या कामात दिसून येईल,” असं प्रणित मोरे व्हिडीओमध्ये म्हणाला.

पाहा प्रणित मोरेचा व्हिडीओ

दरम्यान, प्रणितच्या या व्हिडीओवर विविध प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. काहींनी त्याच्यावर टीका केली आहे. तर काहींनी त्याने माफी मागितली असल्याने त्याला एक संधी देण्यात यावी, असंही म्हटलं आहे. कुनिका सदानंदसह अनेक सेलिब्रिटींनीही त्याच्या या व्हिडीओवर कमेंट करून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

३७० रुपयांच्या बिर्याणीचे प्रकरण नेमके काय?

प्रणितच्या शोमध्ये हिमांशू जांगराने स्वत:च्या डेटिंगचा अनुभव सांगतिला. मात्र, यादरम्यान हिमांशूने सगळ्या मर्यादा ओलांडल्या आणि महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. “बिर्याणीचं ३७० रुपयांचं बिल भरलंय, मग ते पैसे वसूल नको का करायला?” म्हणजेच बिर्याणीच्या पैशांच्या बदल्यात तो महिलेकडून लैंगिक संबंधांची अपेक्षा करत होता. त्याने त्या डेटिंगनंतर तरुणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, त्याचा किस्साही रंगवून सांगितला होता.

मृतदेहांच्या गुप्तांगाबद्दल काय म्हणाली होती सेजल पवार?

मेडिकल कॉलेजच्या ‘डिसेक्शन रूम’मधील (पोस्ट मॉर्टेम रूम) तिचा अनुभव सांगताना सेजल म्हणाली की, पोस्टमॉर्टम आणि डिसेक्शन दरम्यान सर्वात आधी पोट आणि कवटी उघडली जाते, आणि शेवटी प्रायव्हेट पार्ट्सची तपासणी केली जाते. यावर प्रणित मोरे गमती म्हणतो, “तू नक्की डॉक्टर आहेस की कसाई? तिथे सगळे लोक गंभीर असतात की विनोदही केले जातात?” यावर उत्तर देताना ती डॉक्टर म्हणते की, तिथे कधीकधी लोक मृतांच्या प्रायव्हेट पार्ट्सच्या आकारावरून विनोद करतात.

हे ऐकून प्रणित म्हणतो, “काय? तुम्ही लोक अशा गोष्टी बोलता? बिचाऱ्या काकांनी चांगल्या कामासाठी आपले देहदान केले आणि तुम्ही हे सगळं बोलता.” यानंतर तो पुढे गंमतीने म्हणतो, “आता आम्ही आमचे शरीर कसे दान करणार?”