Zee Marathi New Serial : ‘झी मराठी’ने यंदा पुरस्कार सोहळ्यादरम्यान दोन नव्या मालिकांची घोषणा केली. यातील एक मालिका आहे ‘येतेच आता मी नांदायला!’ आणि दुसरी मालिका आहे ‘इच्छाधारी नागीण’. खरंतर, नागीण मालिकेची प्रेक्षक अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत होते. जवळपास दोन महिन्यांपूर्वी ‘झी मराठी’ने नागीणच्या भूमिकेतील लीड अभिनेत्रीचा चेहरा सर्वांसमोर उघड केला होता. आधी गौरी शेळगांवकर या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार होती.

पण, नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये ‘झी मराठी’ने ‘इच्छाधारी नागीण’ मालिकेची लीड अभिनेत्री बदलल्याचं समोर आलं आहे. आता नागकन्येची भूमिका अभिनेत्री शिवानी मुंढेकर साकारणार आहे. यापूर्वी शिवानीने स्टार प्रवाहच्या ‘मुरांबा’ मालिकेत काम केलेलं आहे.

शिवानी मुंढेकरसह ‘इच्छाधारी नागीण’मध्ये लोकप्रिय अभिनेता अजिंक्य ननावरे प्रमुख भूमिका साकारणार आहे. अजिंक्यचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वी त्याने ‘झी मराठी’च्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.

शिवानी मुंढेकर, अजिंक्य ननावरे, आस्ताद काळे आणि ‘अस्मिता’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ ‘इच्छाधारी नागीण’मध्ये झळकणार आहे. या मालिकेच्या प्रसारणाची वेळ अन् तारीख अद्याप वाहिनीने गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. लवकरच वाहिनीकडून याचा मुहूर्त जाहीर केला जाईल.

दरम्यान, ‘इच्छाधारी नागीण’च्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. विशाल निकम, किरण गायकवाड, अनिकेत विश्वासराव, सिद्धार्थ खिरीड, सानिका काशीकर, आशुतोष गोखले, समृद्धी केळकर यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.