Kavita Medhekar On Char Divas Sasuche: २००१ साली प्रदर्शित झालेली ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका २०१३ पर्यंत चालू होती. या मालिकेत रोहिणी हट्टंगडी, भार्गवी चिरमुले, कविता मेढेकर, मानसी नाईक, प्रिया मराठे, आनंद काळे, प्राजक्ता कुलकर्णी असे अनेक लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकेत होते.
आता या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम केलेल्या अभिनेत्री कविता मेढेकर यांनी एका मुलाखतीत त्या काळी जर सोशल मीडिया असता तर ‘चार दिवस सासूचे’ मालिका ट्रोल झाली असती, असे वक्तव्य केले आहे. तसेच या मालिकेत कास्टिंग कशी झाली, बाळ झाल्यानंतर कसे शूटिंग केले, याबद्दलही कविता मेढेकर यांनी वक्तव्य केले आहे.
कविता मेढेकर काय म्हणाल्या?
कविता मेढेकर यांनी नुकतीच ‘लोकशाही फ्रेंडली’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ‘चार दिवस सासूचे’ मालिकेबाबत त्या म्हणाल्या, “मी त्या काळात नाटकात काम करत होते, त्यावेळी मला ‘चार दिवस सासूचे’ मालिकेसाठी विचारणा झाली. मी त्यांना सांगितलं की मला नाटकाचे प्रयोग असतात. ते म्हणाले की, आपण प्रयोग अॅडजेस्ट करू. त्यानंतर मी नाटकाच्या दिग्दर्शकांना सांगितलं की मालिकेत काम करत आहे आणि प्रमुख भूमिका आहे. तर प्रयोग आधी दिले तर मी त्यांना ते सांगू शकेन. नाटक व मालिकेची दोन्ही प्रॉडक्शन हाऊस अत्यंत शिस्तबद्ध होते. एकदा तारखा दिल्या की त्यात बदल व्हायचे नाहीत. मग त्या तारखांच्याप्रमाणे शूटिंग लावायचे. आम्ही वेळेत पोहोचायचो, वेळेत काम करायचो आणि वेळेत निघायचो.”
पुढे कविता मेढेकर म्हणाल्या, “मी आतापर्यंत हजारो एपिसोडमध्ये काम केलं आहे, पण मी रात्री उशिरापर्यंत काम केलं नाही. आपण सगळ्या गोष्टींबाबत स्पष्ट असलं की सगळ्या गोष्टी होतात. असं म्हणतात की, मालिकांत काम करणं म्हणजे मग वेळी-अवेळी काम करावं लागतं. पण, गेल्या २०-२५ वर्षांत मी असं काम केलेलंच नाही.”
“मी गरोदर होते तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की मी मालिका सोडते. पण, त्यांनी तीन महिन्यांची रजा दिली. बाळ झाल्यानंतरदेखील मी सात-आठ महिने बाळाला सेटवर घेऊन जायचे. त्यांनी मला एक वेगळी खोली दिली होती. माझी आईदेखील बरोबर येत होती.”
कविता मेढेकर असेही म्हणाल्या, ” मी गमतीने नेहमी म्हणते की, त्या वेळेला सोशल मीडिया नव्हता. सोशल मीडिया असता तर ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका खूप ट्रोल झाली असती. मग आम्ही १० आणि ११ वर्षे शूटिंग करू शकलो नसतो. आता आम्ही मालिकांमध्ये काही वेगळं केलं तर सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जातं. पण, जसं ट्रोल करतात तसं कौतुकही होतं. म्हणजे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील भुवनेश्वरीचे कौतुक झाले आणि तिला ट्रोलदेखील करण्यात आले.”
दरम्यान, कविता मेढेकर यांची ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील भूमिका चांगलीच गाजली होती.