Ila Bhate On How She improved her voice: ईला भाटे सध्या ‘कमळी’ मालिकेत अन्नपूर्णा महाजन ही भूमिका साकारत आहेत. घराची जबाबदारी सांभाळणारी, कणखर स्त्री अशी अन्नपूर्णा आजीची प्रतिमा आहे. हीच कडक शिस्तीची आजी मोठ्या नातीच्या शोधात हळवी होते, प्रेमाने लोकांना सांभाळते; त्यामुळे अन्नपूर्णा आजी प्रेक्षकांची लाडकी आहे.
ईला भाटे यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात कशी झाली, तसेच काही किस्से सांगितले. तसेच, त्यांनी याच मुलाखतीत आवाजावर टीका झाली होती असे वक्तव्य केले.
ईला भाटे म्हणाल्या, “मी १९८९ मध्ये ‘दुसरा सामना’ हे नाटक केलं होतं, ज्यामध्ये नामंवत कलाकार, निर्माते होते. कलावैभव ही संस्था होती. सतीश आळेकर हे नाटककार होते. वामन केंद्रेंनी दिग्दर्शन केले होते. विक्रम गोखले आणि विनय आपटे हे प्रमुख भूमिकेत होते. त्या दोघांची मैत्रीण अशी माझी भूमिका होती. भूमिका फार मोठी नव्हती, पण महत्त्वाची होती.”
“थोड्याशा कौतुकाबरोबरच सगळ्यात मोठी टीकाही…”
“मला त्या नाटकात काम करायला मिळाले, त्याचा मला खूप आनंद होता. त्या नाटकानंतर नवीन मुलगी आहे, मेहनती दिसते, चांगला चेहरा आहे अशा थोड्याशा कौतुकाबरोबरच सगळ्यात मोठी टीकाही आवाजाबद्दल झाली होती. आवाज सुखद नाही, अनुनासिक आहे; त्यामुळे मी खचले होते. कारण-तोपर्यंत मला लक्षात आलं होतं की मला याच क्षेत्रात काम करायला आवडत आहे.”
“मी विचार केला की इथे जर आपल्याला काम करायचं आहे आणि लोकांना जर आपला आवाज आवडत नसेल तर काय करायचं? समीक्षक वगैरे उगीचच माझ्यावर टीका करायची म्हणून करत नाही. जर माझ्यातील ही उणीव आहे किंवा दोष आहे, याच्यावर मी जर काम केलं तर मला अधिक चांगलं काम या क्षेत्रात करता येईल. त्यावेळी मी अनेकांना विचारलं की आवाजामध्ये सुधारणा करण्यासाठी मी काय करू? त्यावेळी सगळ्यांनी मला डॉक्टर अशोक रानडे हे नाव सांगितले होते.”
पुढे ते म्हणाले, “मला त्यांच्याकडे विक्रम गोखले घेऊन गेले होते. त्यांनी मला जे शिकवलं, त्याचा मी आजतागायत सराव करते. अजूनही मी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून किंवा त्यांनी मला जे ज्ञान दिलं, त्यातून मी अजूनही शिकत आहे. त्यांनी मला ३० सेशनमध्ये आवाज जोपासना शास्त्राबद्दल शिकवलं, त्यानी माझा फक्त आवाज बदललेला नाही तर त्यांनी अभिनयाकडे बघण्याची एक वेगळी, सखोल दृष्टी दिली, हे खूप महत्त्वाचं आहे.”
“आधी त्यांनी मला माझा आवाज ओळखायला सांगितला. ते मला म्हणाले होते की लोकांना माझा आवाज आवडत नाही हे मला येऊन सांगू नकोस. तुझ्या आवाजाचा जास्त उपयोग अभिनयासाठी होणार आहे; तर कुठले भाव व्यक्त करण्यासाठी तुझा आवाज सक्षम नाही असं तुला वाटतं हे तू मला सांग. तुला कोणाचा आवाज आवडतो हे सांग. मग मी विचार केला की घुमारेदार आवाज असतो, तो मला आवडतो. मग माझ्याच आवाजामध्ये घुमारेदारपणा निर्माण करण्यासाठी कोणते व्यायाम करायचे हे त्यांनी सांगितले.”
“स्वराची पातळी कुठली आहे, जिथून तू वर आणि खाली जाऊ शकतेस अशा अनेक गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी शिकवलं की शब्दांशी खेळा, त्यावर प्रेम करा, शब्द हे अभिनयाचे गर्भरूप आहेत, असे सरांचे शब्द आहेत. त्यानंतर मी जी पुढची नाटकं करत गेले, त्या प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाला सर यायचे. ते पाहिल्यानंतर ते मला सूचना द्यायचे. १९९८ ला मी ‘सोक्षमोक्ष’ हे नाटक केलं. ते नाटक ते पाहायला आले होते. ते नाटक पाहिल्यानंतर त्यांनी मला कोणत्याही सूचना केल्या नाहीत. ते मला म्हणाले होते की मी जे जे तुला शिकवलं ते तुला आता कळलेलं आहे, तुझी प्रगती होत आहे”, असे म्हणत ईला भाटेंनी आवाजावर कसे काम केले याबद्दल सांगितले.

