टीव्हीवरील काही लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोपैकी एक म्हणजे ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ हा शो. या शोच्या ११ व्या सीझनचा नुकताच ग्रँड फिनाले सोहळा पार पडला. यात कोलकात्याच्या ‘अमेजिंग अप्सरा’ या डान्स ग्रुपने विजेतेपद पटकावलं आहे.

‘इंडियाज गॉट टॅलेंट’ हा शो गेले तीन महिने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करीत होता. अखेर ४ जानेवारी रोजी शोचा ग्रँड फिनाले पार पडला असून यंदाच्या सीझनला नवा विजेता मिळाला आहे. कोलकात्याच्या ‘अमेजिंग अप्सरा’ डान्स ग्रुपने विजेतेपद जिंकलं असून त्यांच्या अनोख्या आणि आश्चर्यकारक परफॉर्मन्सेसनी परीक्षक आणि प्रेक्षकांची मनं जिंकली.

‘इंडियाज गॉट टॅलेंट’चे ‘टॉप ७’ कंटेस्टंट्स :

या सीझनमध्ये फायनलपर्यंतचा सर्वच स्पर्धकांचा प्रवास खूपच रोमांचक होता. टॉप ७ फायनलिस्ट्समध्ये ‘अमेजिंग अप्सरा’सह ‘वी कंपनी’, ‘आकाश आणि अभिषेक’, ‘नेपाल टायगर्स’, ‘क्लासिक क्वीन्स’, ‘विक्की कृष्णा’ आणि ‘कैलिबॉयज’ यांचा समावेश होता. हे सर्व स्पर्धक वेगवेगळ्या प्रकारच्या कलांमध्ये पारंगत होते. कुणाचा डान्स ग्रुप होता, तर कुणी स्टंट्स आणि अ‍ॅक्रोबॅटिक्समध्ये माहिर होतं. पण शेवटी ‘अमेजिंग अप्सरा’ने विजय मिळवला.

Award Banner

‘अमेजिंग अप्सरा’चा अनोखा आणि आश्चर्यचकित करणारा डान्स पाहून प्रेक्षक आणि परीक्षकही थक्क झाले. ऑडिशनपासून ते फायनलसाठी त्यांनी नेहमी काहीतरी नवीन आणि शॉकिंग परफॉर्मन्स दिले. यंदा शोचे परीक्षक होते, नवज्योत सिंग सिद्धू, मलायका अरोरा आणि गायक शान. या तिघांनी संपूर्ण सीझनमध्ये स्पर्धकांना योग्य ते मार्गदर्शन केलं. तसंच वेळोवेळी प्रोत्साहनही दिलं.

‘इंडियाज गॉट टॅलेंट ११’च्या ग्रँड फिनालेला अजून खास बनवण्यासाठी काही बॉलीवूड कलाकारांनीदेखील हजेरी लावली होती. करिश्मा कपूर, इमरान हाश्मी, शरद केळकर, झोया अफरोज आणि ‘मास्टरशेफ इंडिया’ शोचे परीक्षक विकास खन्ना, रणवीर बरार आणि कुनाल कपूर हेही या ग्रँड फिनालेमध्ये सहभागी झाले होते.

‘अमेजिंग अप्सरा’ला बक्षीस मिळाले…

‘अमेजिंग अप्सरा’चा डान्स फॉर्म्सच्या अनोख्या फ्युजनला परीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. त्यांना शोमध्ये गोल्डन बजरही मिळालं आणि अखेर हा ग्रुप विजेता ठरला आहे. या विजयानंतर ग्रुपने राष्ट्रीय स्तरावर आपली कला सादर करण्याच्या संधीसाठी आभार व्यक्त केले. दरम्यान, ‘अमेजिंग अप्सरा’ला ट्रॉफीसह १५ लाख रुपयांची रोख रक्कम, स्कोडा कार आणि स्पॉन्सर्सकडून अनेक आकर्षक गिफ्ट्स मिळाली आहेत.