Indrayani serial fame Kshama Deshpande and Kanchi Shinde: ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर इंद्रायणी ही मालिका २०२४ मध्ये सुरू झाली होती. आता जवळजवळ दोन वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्यानंतर मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

मालिकेत अनेक कलाकार विविध भूमिका साकारताना दिसले. बालकलाकार सांची भोयरने छोट्या इंदूची भूमिका साकारली होती; तर मोठ्या इंदूची भूमिका कांची शिंदेने साकारली होती. त्याबरोबरच मालिकेत अनिता दातेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.

‘इंद्रायणी’मध्ये खलनायिकेची म्हणजेच श्रीकलाची भूमिका अभिनेत्री क्षमा देशपांडेने साकारली होती. इंद्रायणीला सतत त्रास देणारी, तिच्या कुटुंबाविरुद्ध सतत कट-कारस्थान करणारी श्रीकला ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.

“माझी ऑनस्क्रीन शत्रू आणि ऑफस्क्रीन घट्ट मैत्रीण…”

आता श्रीकलाने म्हणजेच अभिनेत्री क्षमा देशपांडेने मालिका संपल्यानंतर इंद्रायणीची भूमिका साकारणाऱ्या कांची शिंदेच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्रीने त्याचे अनेक सुंदर फोटोदेखील शेअर केले आहे. काही फोटो हे मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे आहेत. काही पडद्यावरचे तर काही पडद्यामागचे हे फोटो आहेत.

हे फोटो शेअर करत तिने लिहिले, “माय डिअर बिच्चू, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! माझी ऑनस्क्रीन शत्रू आणि ऑफस्क्रीन घट्ट मैत्रीण. तुझ्याकडून लावणी शिकण्याची कायमच इच्छा होती. पण, आपण इतकं एकत्र काम केलं आणि इतक्या चांगल्या मैत्रिणी झालो, हे फारच कमाल झालं.”

“आपण रोज गुड मॉर्निंग बिच्चू, असे जे एकमेकींना म्हणायचो, मला त्याची आठवण येत आहे. आपल्या गप्पा, सर्जनशील चर्चा, डान्स कसा दोघींना पुन्हा सुरू करायचंय यावर झालेल्या चर्चा, चल एकत्र काहीतरी बसवूयात आणि शूट करूयात, असं म्हणता म्हणता शूट करायच्या राहून गेलेल्या गोष्टी, इंदू – श्रीकला म्हणून एकमेकींना तोडीस तोड दिलेली एनर्जी आणि आपण एकमेकींना प्रोत्साहन देत आलो. आपल्या खूप खूप चांगल्या माझ्याकडे आहेत. ज्या कायम माझ्याजवळ राहतील, आपली हळूहळू फुलत गेलेली मैत्री ही घट्ट मैत्री झालीये. आपल्या वाट्याला खूप छान छान गोष्टी आल्या, ज्या आपण मनापासून परफॉर्म करू शकलो.

“तुझ्याबरोबर काम करताना खूप मजा आली आणि ऑनस्क्रीन इंद्रायणीला श्रीकला म्हणून त्रास द्यायला खूप मजा आली. बाकी ऑफस्क्रीन तर मी किती शांत, निरागस आणि चांगली मुलगी होते, जिने तुला अजिबात अजिबात त्रास दिला नाही.”

शेवटी तिने लिहिले, “आता मला कांची शिंदेला परफॉर्म करताना पाहायचे आहे. तुझी मी पहिली विद्यार्थिनी असेन.” क्षमाच्या या पोस्टवर कांचीनेदेखील कमेंट करीत उत्तर दिले.

कांची शिंदे म्हणाली…

कांची तिच्या भावना व्यक्त करीत म्हणाली, “ही खूप गोड पोस्ट आहे. वाचताना तुझा आवाज माझ्या कानात होता आणि मला माहीत आहे की, हे लिहिताना तू मनात कशी बोलली असशील. इतका वेळ आपण एकत्र घालवला आहे. खूप काळानंतर कोणीतरी इतक्या जवळ आलं आणि मला खात्री आहे की, आपलं हे नातं कायम असणार आहे. खूप प्रेम”, अशी कमेंट करीत कांचीनं प्रेम व्यक्त केलं आहे.

दरम्यान, आगामी काळात हे कलाकार कोणत्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.