Marathi Actor Starts Farming After Serial Ends : मराठी मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत, जे अभिनयाशिवाय व्यवसाय किंवा शेतीकाम करतात. मराठीतले अनेक कलाकार सिनेविश्वात यशस्वी झाल्यानंतरही आपल्या मातीला अन् शेतीला विसरलेले नाहीत. आजही अनेक कलाकार शुटींगमधून वेळ काढून शेतीत रमतात. अशातच आता आणखी एक अभिनेत्याने शेती करण्याचा निर्णय घेतला आहे, हा अभिनेता म्हणजे निशांत पवार.
निशांत कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झाला. या मालिकेत त्याने अधोक्षज नावाची भूमिका साकारली होती. आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा अधोक्षज म्हणजेच अभिनेता निशांत पवार सोशल मीडियावरसुद्धा तितकाच सक्रिय असतो. ‘इंद्रायणी’ मालिका संपताच त्याने आता एक निर्णय घेतलाय, तो म्हणजे शेती करण्याचा. याबद्दल त्याने खास सोशल मीडिया पोस्टसुद्धा शेअर केली आहे.
निशांत सोशल मीडियाद्वारे त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असतो. त्याचबरोबर सेटवरील काही मजेशीर क्षणही तो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतो. अशातच मालिका संपल्यानंतर आता शेती करणार असल्याचे त्याने सांगितले आहे. सोशल मीडियावरील पोस्टमधून त्याने शेताचे काही फोटो शेअर केले आहेत.
“मालिका संपली, शेती चालू” – निशांत पवार
सोशल मीडियावरील या पोस्टमध्ये अभिनेत्याने शेतात उभा असल्याचे, ट्रॅक्टर चालवतानाचे तसेच गाई-गुरांबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसह निशांतने “मालिका संपली, शेती चालू. माझं म्हणजेच आपलं वावर. बेसिकपासून सुरुवात करत आहे”, असं म्हटलं आहे. अभिनेत्याचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांच्याही विशेष पसंतीस पडला आहे. अनेकांनी त्याच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनी “मालिका आणि इंदू-अधूला मिस करत आहोत”, “मालिका खूप छान होती, मला खूप आवडली” अशा कमेंट केल्या आहेत.
निशांतने नुकतीच एक नवीन कारसुद्धा खरेदी केली आहे. याचे खास क्षणसुद्धा त्याने आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले होते. गाडी खरेदी केल्यानंतर आता निशांतने शेती करण्याचा निर्णय घेतला आहे.
निशांत पवारने शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, निशांत ज्या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता ती ‘इंद्रायणी’ मालिका नुकतीच संपली. दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. गेल्याच महिन्यात मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका संपल्यानंतर निशांतने शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. शेती करण्याबरोबरच निशांत पुन्हा पुढे कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार का, याची चाहते वाट पाहत आहेत.
