Indrayani Serial Actor Buys New Car Video : स्वत:च्या मेहनतीच्या कमाईतून एखादी नवीन गोष्ट घेण्याचा आनंद काही औरच असतो. हा आनंद अनेकदा शब्दांत व्यक्तही करता येत नाही. असाच आनंद झाला आहे, एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याला. हा अभिनेता म्हणजे निशांत पवार.
निशांत कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. मालिकेत त्याने अधोक्षज नावाची भूमिका साकारली होती. आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा अधोक्षज म्हणजेच अभिनेता निशांत पवार सोशल मीडियावरसुद्धा तितकाच सक्रिय असतो.
निशांत सोशल मीडियाद्वारे त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असतो. त्याचबरोबर सेटवरील काही मजेशीर क्षणही तो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतो. अशातच त्याने त्याच्या आयुष्यातील एक खास गोष्ट सर्वांबरोबर शेअर केली आहे आणि ती म्हणजे अभिनेत्याने नुकतीच नवीन गाडी घेतली आहे आणि नवीन गाडी घेतल्याचा आनंद त्याने आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
नवीन गाडीबरोबरचे फोटो निशांतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर केले आहेत. अभिनेत्याने टाटा नेक्सन ही गाडी खरेदी केली आहे. नव्या गाडीबरोबरचे फोटो शेअर करताना निशांतने “स्वप्न ते वास्तव – माझी पहिली कार” अशी कॅप्शन दिली आहे. त्याचबरोबर निशांतने गाडीच्या खरेदीचा व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये निशांतचे कुटुंबीय गाडी खरेदी करायला गेल्याचे दिसत आहे. तसेच त्याच्या आईने नव्या गाडीची पूजादेखील केली. या नवीन गाडीच्या निमित्ताने निशांतने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणतो, “पप्पा म्हणायचे स्वतः कमव आणि स्वतः घे. आज स्वामींचे आशीर्वाद आणि आई-वडिलांच्या पुण्याईमुळे मी त्यांचं आणि माझं हे स्वप्न पूर्ण करू शकलो. पहिली गाडी खरेदी केली.”
निशांत पवारने नव्या गाडीबरोबरचे शेअर केलेले फोटो
निशांतने ही नवीन गाडी खरेदी करताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अभिनेत्याला त्याच्या अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी नवीन गाडी घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. “अभिनंदन निशांत”, “तुझा अभिमान वाटतो”, “असंच स्वत:चं आणि आई-वडिलांचं प्रत्येक स्वप्न पूर्ण कर”, या आणि अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
निशांतने नव्या गाडीच्या खरेदीचा शेअर केलेला व्हिडीओ
दरम्यान, निशांत ज्या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता ती ‘इंद्रायणी’ मालिका नुकतीच संपली आहे. दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि गेल्या महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे आता यापुढे मालिकेतील इतर कलाकार, तसेच निशांत पवार पुन्हा कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, याची चाहते वाट पाहत आहेत.
