Inspector Manju fame Vaibhav Kadam on Monika Rathi: आज (२ ऑगस्ट २०२६)मैत्री दिन साजरा केला जात आहे. कलाकारही त्यांच्या सहकलाकारांबरोबर असलेल्या बॉण्डिंग आणि मैत्रीबद्दल मनमोकळेपणाने बोलत आहेत.
‘सन मराठी’वरील महाराष्ट्राची लाडकी मालिका ‘इन्स्पेक्टर मंजू’मधील सत्या आणि मंजूची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. पडद्यावर त्यांची केमिस्ट्री मन जिंकते. मंजू ही भूमिका अभिनेत्री मोनिका राठी आणि सत्या ही भूमिका अभिनेता वैभव कदम यांनी साकारली आहे. मैत्री दिनाच्या निमित्ताने कलाकारांनी त्यांच्या मैत्रीबद्दल सांगितले आहे.
“माझी आणि मोनिकाची मैत्री…”
वैभव म्हणाला, “मालिकेला आता अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र माझी आणि मोनिकाची मैत्री या मालिकेच्या आधीपासूनची, म्हणजे जवळपास सात-साडेसात वर्षांची आहे. आमची कौटुंबिक ओळखही तितकीच जुनी आणि घट्ट आहे. त्यामुळे सेटवर एकत्र काम करताना आमच्यातील कम्फर्ट आणि विश्वास आपोआप दिसून येतो. स्क्रीनवरील आमची केमिस्ट्रीही याच मैत्रीमुळे अधिक सहज आणि नैसर्गिक वाटते. मित्रांसह काम करताना कामाचा ताण जाणवत नाही. उलट सेटवरील वातावरण हलकं-फुलकं राहतं आणि प्रत्येक सीन करताना अधिक मजा येते.”
तो पुढे म्हणाला, “मोनिका एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. ‘इन्स्पेक्टर मंजू’च्या भूमिकेतून तिला संपूर्ण महाराष्ट्राचं भरभरून प्रेम मिळत आहे. तिच्यात कोणताही बदल व्हावा, असं मला वाटत नाही. ती जशी आहे, तशीच खूप छान आहे. मित्रांसह काम करण्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे रोमँटिक, भावनिक किंवा कॉमेडी असा कोणताही सीन अधिक नैसर्गिक होतो. विशेषतः कॉमेडी करताना आमच्यातील खरी मैत्री खूप उपयोगी पडते. आमच्यात कोणताही संकोच नाही. एखादी गोष्ट आवडली नाही, तर ती तशीच स्पष्टपणे सांगण्याइतका मोकळेपणा आणि विश्वास आमच्या मैत्रीत आहे.
सध्या मालिकेत ‘इन्स्पेक्टर मंजू’च्या मिशनचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू आहे. हे मिशन यशस्वी होणार का आणि ‘सत्या-मंजू’ची जोडी या संकटावर कशी मात करणार, हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल.
