Inspector Manju New Entry: ‘इन्स्पेक्टर मंजू’ ही सन मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील पात्रे, ट्विस्ट यांमुळे ही मालिका कायमच चर्चेत असते. मालिकेत पुढे काय होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता असते.

इन्स्पेक्टर मंजू या मालिकेत नवीन एन्ट्री होणार आहे. आता ही एन्ट्री कोणाची असणार, कोणता कलाकार कोणती भूमिका साकारणार, तसेच नवीन एन्ट्रीमुळे मालिकेत काय बदल होणार, हे जाणून घेऊ…

‘नवी जन्मेन मी’ फेम अभिनेत्रीची ‘इन्स्पेक्टर मंजू’ मालिकेत एन्ट्री

अभिनेत्री शिल्पा ठाकरेची इन्स्पेक्टर मंजू मालिकेत एन्ट्री होणार आहे. ती अनुष्का पाटील ही भूमिका साकारणार आहे. याआधी तिच्या नवी जन्मेन मी या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे.तसेच ‘प्रेमा’, ‘परफ्युम’, ‘ट्रिपल सीट’, ‘खिचीक’, ‘इभ्रत’ आणि ‘भिरकीट’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये ती महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसली आहे. याबरोबरच, ती सुम्मी या हिंदी शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती. लवकरच ती The Chosen Family या प्रोजेक्टमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विशेष म्हणजे, इन्स्पेक्टर मंजूमध्ये शिल्पा नायिकेच्या नाही तर खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेबद्दल ती म्हणाली, “‘नवी जन्मेन मी’नंतर प्रेक्षकांनी मला खूप प्रेम दिलं आणि नेहमी सकारात्मक भूमिकांमध्ये स्वीकारलं. त्यामुळे खलनायिकेची भूमिका करायची ऑफर आली तेव्हा मी सुरुवातीला थोडी साशंक होते. प्रेक्षक मला या भूमिकेत स्वीकारतील का हा प्रश्न होता. पण अनुष्का ही फक्त खलनायिका नाही, तिच्यामागे खूप भावना, वेदना आणि एक मोठं रहस्य आहे. अभिनेत्री म्हणून मला स्वतःला रिपीट करायचं नव्हतं, म्हणून मी हा निर्णय घेतला.”

इन्स्पेक्टर मंजू मालिकेत दाखविल्याप्रमाणे, मंजूची साताऱ्यात पोस्टिंग सत्या ला अटक करण्यासाठी झाली होती. मात्र सत्या ला अटक करण्याऐवजी ती त्याच्याच प्रेमात पडल्यामुळे कथेला वेगळंच वळण मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर अनुष्काची एन्ट्री होते. ती फक्त मंजूवर लक्ष ठेवण्यासाठी आलेली नसून तिच्या भूतकाळाशी जोडलेलं एक मोठं रहस्य आणि सूडाची भावना घेऊन आली असल्याचं समोर येत आहे.

अनुष्का नेमकी कोण आहे?तिचा सत्याशी काय संबंध आहे? आणि ती मंजू-सत्या यांच्या आयुष्यात कोणतं वादळ आणणार? आता अभिनेत्रीची ही नवीन भूमिका प्रेक्षकांना आवडणार का, मालिकेत नेमकं काय घडणार? अनुष्काच्या एन्ट्रीमुळे काय ट्विस्ट येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.