दरवर्षी हजारो तरुण कलाकार बनण्याचं स्वप्न पाहत मुंबईत येतात. मात्र, या प्रवासात अनेक अडथळे येतात आणि प्रत्येकाचा प्रवास सोपा नसतो. मोहम्मद इक्बाल खान, ज्याला इक्बाल खान म्हणून ओळखलं जातं, याचं उत्तम उदाहरण आहे. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात बॉलीवूडमधील दोन अयशस्वी चित्रपटांपासून झाली. त्यानंतर त्याने अभिनय क्षेत्र सोडून परतण्याचाही विचार केला होता. मात्र, पुढे तो हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय नायकांपैकी एक म्हणून प्रसिद्ध झाला.

काश्मीरमध्ये जन्मलेला इक्बाल खान २००१ मध्ये वयाच्या विशीत मुंबईत आला. बॉलीवूडमध्ये येऊन लगेच स्टार होण्याचं त्याचं स्वप्न होतं. त्याला शाहरुख खानसारखं यश मिळवायचं होतं आणि मुंबईत आल्यानंतर लगेचच आपली ओळख निर्माण होईल, असा त्याला विश्वास होता. मात्र, त्याच्या नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं. इक्बालला सुरुवातीला ‘Fun2shh… Dudes in the 10th Century’ (२००३) आणि ‘बुलेट: एक धमाका’ (२००५) या हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मात्र, त्याचे हे चित्रपट शाहरुख खानच्या ‘कल हो न हो’, संजय दत्तच्या ‘मुन्ना भाई एम.बी.बी.एस’ आणि ‘LOC Kargil’ यांसारख्या मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांच्यावेळी प्रदर्शित झाले. त्यामुळे त्याच्या सुरुवातीच्या चित्रपटांना अपेक्षित प्रतिसाद मिळणं कठीण झालं. दोन्ही चित्रपट फारसे चालले नाहीत आणि त्यानंतर इक्बालला फारसं कामही मिळालं नाही.

दोन वर्षे नव्हतं काम

बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत इक्बालने त्याच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगितली. तो म्हणाला, “जेव्हा मी मुंबईत आलो, तेव्हा इथे येताच आपण शाहरुख खान बनू, असं मला वाटलं होतं. मला वाटतं, मुंबईत येणाऱ्या प्रत्येकालाच असंच वाटतं की आपल्यासोबतही असंच घडेल. पण सुरुवातीला तसं काहीच झालं नाही. ज्या चित्रपटांमधून मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली, तेही चालले नाहीत.” खर्च वाढत असताना इक्बालला घराचं भाडं आणि फोन रिचार्जसारख्या मूलभूत गरजा भागवणंही कठीण झालं होतं. जवळपास दोन वर्षे त्याच्याकडे काम नव्हतं. आर्थिक अडचणींमुळे त्याला स्वतःची कारही विकावी लागली आणि त्यानंतर तो बसने प्रवास करू लागला. या कठीण आर्थिक परिस्थितीमुळे त्याने मुंबई सोडून परत जाण्याचाही गंभीरपणे विचार केला होता.

‘टेलिव्हिजनचा शाहरुख खान’ म्हणून मिळाली नवीन ओळख

इक्बाल मुंबई सोडून घरी परतण्याच्या विचारात असतानाच त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक संधी त्याच्याकडे आली. त्याने बालाजी टेलिफिल्म्सच्या ‘कैसा ये प्यार है’ (२००५) या रोमँटिक मालिकेत मुख्य भूमिका स्वीकारली. सुरुवातीला घराचं भाडं भरण्यासाठी कामाची गरज होती, त्यामुळे त्याने ही भूमिका स्वीकारली.या मालिकेत त्याने रॉकस्टार अंगद खन्नाची भूमिका साकारली. या भूमिकेमुळे इक्बाल रातोरात लोकप्रिय झाला. त्याचा दमदार अभिनय, भारदस्त आवाज आणि बॅड-बॉयसारखा अंदाज प्रेक्षकांना पसंत पडला. एकता कपूरने इक्बालला ‘कैसा ये प्यार है’मध्ये मुख्य भूमिकेत घेतल्यानंतर ही मालिका लवकरच प्राइम टाइमवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक ठरली.

त्याच्या रोमँटिक अंदाजामुळे, व्यक्तिमत्त्वामुळे आणि मोठ्या महिला चाहतावर्गामुळे एकता कपूरने त्याला सार्वजनिकरित्या ‘छोट्या पडद्याचा शाहरुख खान’, म्हणजेच टेलिव्हिजनचा शाहरुख खान, अशी ओळख दिली. यानंतर इक्बालने ‘काव्यांजली’, ‘कहीं तो होगा’, ‘तुम्हारी पाखी’ आणि ‘संजोग से बनी संगिनी’ यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं. त्यामुळे टेलिव्हिजनवरील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचं स्थान अधिक मजबूत झालं. तो टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक ठरला. पुढील काळात त्याने ‘एक था राजा एक थी रानी’, ‘बहू हमारी रजनीकांत’ आणि ‘दिल से दिल तक’ यांसारख्या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या.

टेलिव्हिजनपुरतं स्वतःला मर्यादित न ठेवता इक्बालने आपल्या टीव्हीवरील यशाचा उपयोग चित्रपट आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरही काम करण्यासाठी केला. गेल्या काही वर्षांत त्याने चित्रपट आणि ओटीटीमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.‘क्रॅकडाउन’ आणि ‘कमांडर करण सक्सेना’ यांसारख्या थरारक वेबसीरिजमधून त्याने ओटीटीविश्वात पदार्पण केलं. याशिवाय त्याने पुन्हा चित्रपटांकडेही वळत ‘जलसा’ (२०२२) आणि ‘इंदू की जवानी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. ‘जलसा’मध्ये विद्या बालन आणि शेफाली शाह यांच्या प्रमुख भूमिका होत्या.