मुंबईतील रिक्षाचालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान बंधनकारक केल्याने ते चर्चेत आले आहेत. यामध्ये आता मराठी बिग बॉस फेम रशियन मॉडेल आणि अभिनेत्री इरिना रुडाकोवा हिने रिक्षाचालकाचा व्हिडीओ शेअर केला आहे. मुंबईत रिक्षाचालकाला एका गाडीचालकाने अर्वाच्च भाषेमध्ये शिवीगाळ आणि धमकी दिल्याने इरिनाने कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करण्याची मागणी इरिनाने केली आहे.

रशियन मॉडेल आणि अभिनेत्री इरिना रुडाकोवा ही सिनेविश्वामध्ये सक्रिय असून मराठी बिग बॉसमुळे तिची घराघरांत ओळख निर्माण झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर रस्त्यावरील भांडणाचा व्हिडीओ शेअर केला. रिक्षाने प्रवास करत असताना एका गाडीचालकाने धडक दिल्याचा दावा करत रिक्षाचालकाला धमकी दिली. मुंबईतील हे असे वागणे थांबवले पाहिजे, अशी मागणी इरिनाने केली आहे.

इरिना रुडाकोवाने शेअर केला रिक्षाचालकाचा व्हिडीओ

इरिना रुडाकोवाने रिक्षाचालकाला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ शेअर केला. यावेळी ती स्वतः रिक्षामध्ये बसली असून तिच्या रिक्षाचालकाला शेजारून जाणाऱ्या एका गाडीचालकाने शिवीगाळ केली. रिक्षाचालकाची कॉलर पकडून त्याला बाहेर ओढले आणि त्यानंतर वाईट पद्धतीने बोलून शिवीगाळ केली. रिक्षाचालक वारंवार माफी मागूनही गाडीचालक त्याला तुला इथेच मारेन, असे म्हणत असल्याचे दिसून आले. चारचाकी गाडीला रिक्षाने धडक दिल्याचा दावा केला आहे, मात्र त्याला कोणताही धक्का न लागल्याचे इरिनाने तिच्या व्हिडीओमध्ये सांगितले.

इरिना संताप व्यक्त करत म्हणाली, मला पूर्ण पाठिंबा हवा आहे, कारण मुंबईत अशा प्रकारचं वर्तन थांबायला हवं आणि हे अजिबात योग्य नाही. काही धक्का लागला असता तर जाणवले असते. पण, काहीच धक्का लागला नाही. नियम त्या कारचालकानेच मोडला असून त्याचे हे वर्तन खूप चुकीचे आहे. कारचालकाने कोणत्याही कारणाशिवाय हा सगळा गोंधळ घातला. अशा लोकांमुळे गरीब लोकांना असा त्रास सहन करावा लागतो.”

चाहत्यांनी सुरक्षेबद्दल व्यक्त केली चिंता

पुढे ती म्हणाली, “त्याला कोणावरही हात उचलण्याची परवानगी नाही, हे योग्य नाही.” तसेच या प्रकरणात मदत करण्याचं आवाहन तिने नागरिकांना केलं. पोलिसांशी कोणाचा संपर्क असेल तर त्यांनी पुढे येऊन मदत करावी, असेही इरिना म्हणाली आहे. इरिनाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर चाहत्यांनी तिच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच असे व्हिडीओ थेट सोशल मीडियावर शेअर करू नयेत, असा सल्लाही काहींनी दिला. त्यावर इरिनाने स्पष्टपणे म्हटलं, “मी घाबरलेली नाही, माझ्याकडून काहीही चुकीचे झालेले नाही आणि माझ्या रिक्षाचालकाकडूनही काही चुकीचे झालेले नाही; त्याला विनाकारण मारले.”

दरम्यान, इरिना रुडाकोवा ही एक रशियन मॉडेल असून तिने मराठी व हिंदी मनोरंजन विश्वामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. इरिना ‘छोटी सरदारनी’ या हिंदी मालिकेत झळकली होती. यानंतर तिने बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामध्ये सहभागी होत सर्वांचे लक्ष वेधले होते. IPL मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाची चीअरलीडर म्हणूनदेखील तिने काम केले आहे.