ईशा केसकर मराठी मालिका व चित्रपटांत काम करणारी लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘जय मल्हार’ या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली आणि मोठा ब्रेक मिळाला. पण अनेकांना माहीत नसेल की तिला या शोसाठी किती मानधन मिळायचं. तिचं मानधन ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही.

ईशा केसकर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अनेकदा ती मनमोकळेपणाने तिची मतं, प्रतिक्रिया व्यक्त करत असते. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत तिने इंडस्ट्रीतील तिचे अनुभव, तिचा अभिनय प्रवास तसेच तिला ‘जय मल्हार’ या मालिकेसाठी किती मानधन मिळालं होतं याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने सांगितलं की आधी ती तिची संपूर्ण कमाई तिच्या आई-वडिलांना द्यायची.

मानधनाबद्दल ईशा केसकर काय म्हणाली?

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ईशा केसकरने तिला तिची लोकप्रिय मालिका ‘जय मल्हार’साठी किती मानधन मिळालं होतं आणि चित्रपट निवडण्यासाठीचे तिचे असलेले निकष तसेच मालिकांबद्दलची मतं याबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्री ‘जय मल्हार’बद्दल म्हणाली, “मी जय मल्हारमध्ये काम करत होते तेव्हा सुरुवातील मला १५०० रूपये पर डे होता. माझे सगळे पैसे मी माझ्या आई-बाबांना द्यायच. त्यातले थोडेसे पैसे ते मला मुंबईत उदरनिर्वाहासाठी द्यायचे.”

ईशा पुढे म्हणाली, “त्यांचं नियंत्रण होतं तोवर गोष्ट वेगळी होती. पण जस जशा मी मालिका करत गेले तसं जितकी आव्हानात्मक भूमिका असेल ती मी स्वीकारायचे. मी त्यांना सांगायचे ठिके आव्हानात्मक भूमिका आहे आता तुम्ही मला एवढे पैसे देत आहात पण जर मी हा रोल चांगला केला तर मला पुढच्या वर्षी एवढे पैसे पाहिजे. असं करुन मी काम केलेलं आहे. पण जर तुम्हाला मी आगाऊ वाटत असेन तर ती तुमची समस्या आहे. तिथे मी तडजोड करत नाही. माझ्या याच स्वभावामुळे मी सुखी आहे असं मला वाटतं. कारण अभिनेत्री असूनही मला खोटं वागता येत नाही याचं मला आश्चर्य वाटतं.”

दरम्यान, या मुलाखतीत ईशाने इंडस्ट्रीत राजकारण व जातीयवाद असल्याचंही सांगितलं आहे. यावेळी त्यांनी प्रश्न विचारणारी अभिनेत्री कोणाला नको असते असंही सांगितलं.