‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे अभिनेता ऋषी सक्सेना घराघरांत पोहोचला. तो मूळचा राजस्थानचा. जोधपूरमधील शाळेत त्याने शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याला सुरुवातीला क्रिकेटची प्रचंड आवड होती. पण, त्यानंतर ऋषी मॉडेलिंगकडे वळला. मुंबईत तो मॉडेलिंगसाठीच आला होता…पण, ४ महिन्यांतच त्याला मॉडेलिंगचा कंटाळा आला. त्यानंतर त्याने वडिलांच्या सांगण्यावरून अभिनय करण्याचा निर्णय घेतला. मग अभिनय कार्यशाळेत प्रवेश घेतला. नाटकात काम केलं…मग, एका मित्राच्या सांगण्यावरून त्याने ‘काहे दिया परदेस’साठी ऑडिशन दिली अन् हाच ऋषीच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. त्याने साकारलेली ‘शिव’ची भूमिका रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. कॅमेऱ्यासमोर अभिनय कसा करायचा, हे तो या मालिकेपासून शिकला. यानंतर ऋषीने ‘फत्तेशिकस्त’, ‘सुभेदार’ या सिनेमांमध्येही काम केलं.

कालांतराने ऋषीच्या आयुष्यात ईशाची एन्ट्री झाली. ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती. दोघांची छान मैत्री होती आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या ९ वर्षांपासून हे दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत.

ईशा केसकर याबाबत ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “ऋषीची मला कोव्हिडमध्ये खूप जास्त मदत झाली. आम्ही दोघंही एकमेकांसाठी उभे राहिलो. मी अशा लोकांच्या सहवासात मोठी झालीये…जे एकमेकांना समजून घेणारे आहेत.”

ईशा पुढे म्हणाली, “मी ऋषीच्या प्रेमात पडले ते त्याची भाषा पाहून नाही तर. ऋषी कसा आहे…त्याचं माझं काय मॅच होतंय….माझा काय Comfort आहे? त्या हिशोबाने मी प्रेमात पडले. त्या परिस्थितीसाठी ते योग्य होतं. कोव्हिडच्या दरम्याने माझे वडील गेले…तेव्हा तो कायम माझ्याबरोबर होता. त्याची साथ होती म्हणूनच मला एकटं वाटलं नाही. त्यामुळे मी नेहमी या सगळ्याचं श्रेय त्याला देते.”

“एक मित्र म्हणून माझं त्याच्यावर विशेष प्रेम आहे. तो माणूस म्हणून पण खूपच चांगला आहे. तो एका हेल्दी वातावरण असलेल्या कुटुंबातला मुलगा आहे. त्याला त्याच्या आई-बाबांचा कायम पाठिंबा मिळालाय. भावनिक सपोर्टही खूप चांगलाय..त्यामुळे तो माणूस म्हणून ग्रीन फ्लॅग… एकदम ग्रीन फॉरेस्ट आहे. तो माझ्यासाठी मराठी भाषा शिकला. मी त्याला एका जागी बसून मराठी शिकवलेलं नाहीये….मी थेट भांडायचे. त्यामुळे तो ऐकून-ऐकून हळुहळू शिकला. मग, मी जरा पुढाकार घेतला की तुझे मराठीचे उच्चार वगैरे बरे आहेत…आणि अशाप्रकारे तो मराठी शिकला” असं ईशाने सांगितलं.