स्टार प्रवाह वाहिनीवर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने दोन वर्षे अधिराज्य गाजवलं. ही मालिका टीआरपीमध्येही आघाडीवर होती. पण, ‘कला’च्या म्हणजेच मुख्य अभिनेत्री ईशा केसकरच्या एक्झिटनंतर अवघ्या महिन्याभरात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आजारपणाच्या कारणास्तव ईशाला या मालिकेतून अचानक एक्झिट घ्यावी लागली होती. यापूर्वी सुद्धा तिने अशाच एका लोकप्रिय मालिकेचा मध्येच निरोप घेतला होता. मालिकाविश्वातील काम, अचानक एक्झिट घेण्याचं कारण… याबद्दल तिने सविस्तर स्पष्टीकरण देत स्वत:ची बाजू मांडली आहे.

ईशा केसकर ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “आपण कितीही काहीही झालं तरी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आज मी तरुण आहे…माझं खाण्या-पिण्याकडे लक्ष आहे आणि पुरेशी झोप सुद्धा मला मिळतेय. तरीसुद्धा दररोज १४ तास किंवा १६ तास शूट करणं…ही गोष्ट फार मोठी आहे. मला हे आता शक्य नाही असं कुठेतरी वाटू लागलं होतं. मला अनेक मोठ्या कलाकारांनी सांगितलं होतं की, मालिकाविश्व हे वेलकमिंग किंवा हवे तेवढे पैसे देणारं माध्यम असलं… तरीही तुम्हाला सुद्धा अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. मला स्वत:साठी थोडा वेळ घ्यायचा होता. अर्थात माझ्यासाठी ती मालिका सुद्धा तेवढीच महत्त्वाची होती.”

ईशा पुढे म्हणाली, “कुठेतरी चॅनेल, प्रोडक्शन टीम आणि कलाकार म्हणून मला आम्हा तिघांनाही यावर काहीच मध्य काढता येत नव्हता. मला वाटलं होतं की, यावर काहीतरी उपाय निघेल पण, दुर्दैवाने तसं घडलं नाही. मी त्या मालिकेत जेवढं काम केलं…ते फार मनापासून केलं. मला प्रेक्षकांचंही खूप प्रेम मिळालं आणि त्यासाठी मी कायम ऋणी आहे. माझा कायम प्रयत्न असतो की, माझी कोणतीही भूमिका आधीच्या भूमिकेसारखी नसावी किंवा माझ्या स्वत:सारखी म्हणजेच ईशासारखीही नसावी. त्यामुळे प्रत्येक भूमिकेसाठी मी शंभर टक्के देत असते. पण, मला मग हळुहळू प्रेशर जाणवू लागलं…म्हणूनच बऱ्याच जणांनी अशाही कमेंट्स केल्या होत्या की, ‘मी लीडमध्ये मालिका करायला नको’. पण, खरंच मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले होते.”

“माझ्या डोळ्यांना इन्फेक्शन झालं होतं. त्यामुळे मला सलग १० तासांची झोप आवश्यक होती. दिवसभर किती पाणी प्यायला पाहिजे, पित्त अजिबात होऊ नये.. यासाठी बरीच काळजी घ्यायची होती. आता मी इतकी मोठीही नाहीये की, मी दीपिका पादुकोणसारखं ८ तास काम करेन असं सांगेन. त्यामुळे मग यावर उपाय शोधणं गरजेचं होतं. मी १२ दिवस आजारी होते…मला सलाईन लावलं होतं. आधीच्या दोन्ही मालिकांमध्ये माझ्याबरोबर आणखी एक लीड अभिनेत्री होती…त्यामुळे ते मॅनेज झालं. पण, इथे असं नव्हतं. याशिवाय सणवार…इतर इव्हेंट असतात ते वेगळे…. एक वर्ष मी खूप आनंदात सगळं केलं…पण, दुसरं वर्ष माझ्यासाठी खूप कठीण गेलं. आता या सगळ्यात माझं आणि त्यांचं नुकसान होण्यापेक्षा मी बाहेर पडणंच मला जास्त योग्य वाटलं. म्हणून मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.”

“आता असं झालंय की, ईशा मालिका सोडते…हे ब्रीदवाक्यच झालं आहे. बरेचजण असं म्हणतात…आणि काही टोमणे मारणारे प्रेक्षक सुद्धा असंच म्हणतात. याशिवाय पहिली मालिका सोडली तेव्हा माझ्या आई-बाबांकडे लक्ष देणारं कुणीच नव्हतं. तेव्हा माझ्या बाबांना कॅन्सरचं निदान सुद्धा झालं होतं. त्यामुळे अशावेळी आपण आपल्या आई-बाबांसाठी तिथे उपस्थित असणं फार महत्त्वाचं असतं.” असं मत ईशाने व्यक्त केलं.