Jahnavi Killekar : सूरज चव्हाणचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबरला थाटामाटात पार पडला. मात्र, ‘गुलीगत किंग’च्या लग्नात सर्वाधिक चर्चा झाली ती जान्हवी किल्लेकरची! ‘किलर गर्ल’ने आपल्या भावाच्या लग्नात प्रचंड एन्जॉय केलं. सूरजच्या लग्नाच्या प्रत्येक विधीदरम्यान जान्हवी उपस्थित होती. तिचे सूरजच्या मेहंदी समारंभातील, हळद आणि लग्नाच्या वरातीमधले फोटो अन् व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सूरजचा लग्नसोहळा पार पडल्यावर जान्हवी मुंबईला आपल्या स्वगृही परतली. मात्र, आता अभिनेत्रीची प्रकृती बिघडल्याचं तिने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमुळे स्पष्ट झालं आहे.

जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या दोन दिवसांपासून जान्हवीचे सूरजच्या लग्नसोहळ्यातील फोटो अन् व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. जान्हवीच्या प्रत्येक लूकच चाहते भरभरून कौतुक करत आहेत. पण, आता प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीची प्रकृती बिघडली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जान्हवीने स्वत: आपली हेल्थ अपडेट चाहत्यांना दिली आहे.

‘Nazar Is Real’ असं कॅप्शन देत जान्हवीने रुग्णालयातून फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री सध्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. जान्हवीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

“मॅडम तुम्ही खरंच छान दिसत होता म्हणून तुम्हाला नजर लागली”, “मॅडम तुमचं मन फारच मोठं आहे सूरजला मोठ्या बहिणीप्रमाणे तुम्ही साथ दिलीत”, “नजर लागली बघा बरोबर १०० टक्के”, “तू एखाद्यावर प्रेम किती करते हे सूरजच्या लग्नात दिसले”, “प्लीज काळजी घ्या”, “दीदी काळजी घ्या धावपळीमुळे झालं असेल लवकर बऱ्या व्हाल” अशा प्रतिक्रिया जान्हवीच्या चाहत्यांनी कमेंट्स मध्ये दिल्या आहेत.

दरम्यान, जान्हवीने सूरज चव्हाणला लग्नाचं गिफ्ट म्हणून सोन्याची सुंदर अंगठी दिली. संजना व सूरज त्यांचा लग्नसोहळा पार पडल्यावर जेजुरी गडावर खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. याशिवाय गुलीगत किंगच्या घरी सत्यनारायण पूजाही पार पडली आहे.