Jahnavi Killekar clarification Bisleri water bath Kolhapur controversy: जान्हवी किल्लेकरने एका मुलाखतीत कोल्हापूरमध्ये शूटिंगसाठी गेल्यानंतर बिसलेरीच्या पाण्याने अंघोळ केली, कारण तिला त्वचेच्या समस्या आहेत असे सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. आता जान्हवीने इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत या प्रकरणावर वक्तव्य केले आहे.
“एका मालिकेच्या शूटिंगच्या दरम्यान मी…”
व्हिडीओमध्ये जान्हवी म्हणाली, “खरंतर हा व्हिडीओ मला अजिबात बनवायचा नव्हता. पण, आपल्या समाजात माणुसकी इतकी ढासळत चालली आहे, स्वत:चे चार व्ह्युज वाढवण्यासाठी, चार लाइक्स, चार फॉलोअर्स वाढवण्यासाठी एखाद्या स्त्रीचा कितीही अपमान केला तरी चालणार; ज्या ज्या लोकांनी माझ्या नावाने व्हिडीओ बनवले आहेत, त्यांचे मनापासून आभार. राहिला प्रश्न माझा, त्या बिसलेरीच्या व्हिडीओचा; तर मला वाटतं की तुम्ही ती फक्त रील पाहिली आहे जी ३० किंवा ६० सेंकदाची असते. त्यात हे अर्धसत्य असतं. जी व्हिडीओ बनवत आहेत, ती अर्ध्या हळदीनेच पिवळी झालेली माणसं आहेत. असो, त्यासाठी तुम्हाला संपूर्ण पॉडकास्ट बघावा लागेले. त्यामध्ये मी स्पष्टपणे म्हटलंय की, मी जेव्हा जेव्हा आऊटडोअर शूटिंगसाठी जाते, तेव्हा मला अमुक अमुक गोष्टी कराव्या लागतात. कारण- मला तितकी त्वचेची काळजी घ्यावी लागते.
राहिला प्रश्न माझ्या त्वचेचा. मी अशा पद्धतीचं का वागतेय तर त्याचंसुद्धा स्पष्टीकरण मी आज तुम्हाला देणार आहे. आजपर्यंत हे फोटो मी जगात कोणालाही दाखवले नाहीत. आज मी सोशल मीडियावर टाकणार आहे. २०१९-२० ची ही गोष्ट आहे. एका मालिकेच्या शूटिंगच्या दरम्यान मी एका ठिकाणी राहत होते जे की आऊटडोअर शूटिंग होतं. मुंबईच्या बाहेरचं शूटिंग होतं. मालिकेचं शूटिंग होतं, जे वर्ष-दीड वर्ष असतं. तिथे जाताना माझी त्वचा चांगली होती. तिथे गेल्यानंतर महिन्याभरात माझा चेहरा पिंपल्सने भरला. त्यावेळी मी खूप उपचार केले.”
पुढे ती म्हणाली, “मी तिथल्या जवळच्या डॉक्टरकडे गेले. त्यांनी मला सांगितलं की कदाचित तुम्हाला पाणी मानवत नाही. कधी कधी अशा गोष्टी घडतात. आपणही कुठेतरी बाहेर गेलो तर कधी कधी आपल्याला तिथलं पाणी मानवत नाही. ही खरी गोष्ट आहे आणि ही फक्त सेलिब्रिटींना लागू होत नाही, हे सगळ्यांना लागू होतं. समस्या ही आहे की मी फार स्पष्ट बोलते असं मला वाटायला लागलं आहे. मी आज सोशल मीडियावर ते सगळे फोटो दाखवणार आहे, की मला या सगळ्या गोष्टी का कराव्या लागतात.
व्हिडीओमध्ये पुढे जान्हवीने तिचे काही फोटो दाखवले, ज्याचा तिने उल्लेख केला होता. त्यामध्ये तिने तिच्या चेहऱ्यावर कशा प्रकराचे इन्फेक्शन झाले होते ते दाखवले. फोटोमध्ये तिचा चेहरा खराब झाल्याचे, चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात मुरूम उठल्याचे दिसत आहे.
ती असेही म्हणाली की, त्यानंतर त्या मालिकेत माझी त्वचा अशी घाणेरडी दिसत होती. मेकअपने थोडंफार कव्हर करायचे, पण तरीही काही फरक पडला नाही. शेवटी मला ती मालिका सोडावी लागली. कारण- तिथल्या डॉक्टरांनी मला तसा सल्ला दिला की तुम्हाला पाण्याचा त्रास होत आहे, कदाचित तुम्ही लहानपणापासून शहरात राहिलेल्या आहात, तर तुम्हाला इथलं पाणी मानवत नाही; तर तुम्ही कुठेही गेलात तर स्वत:ची काळजी घेत जा, नाहीतर त्वचेच्या समस्या होतील. त्यानंतर मी आता जशी माझी त्वचा दिसत आहे, तशी होण्यासाठी लाखो रुपये मोजलेले आहेत. माझी ऐपत नसतानासुद्धा हे केलेलं आहे. कारण- मी एक अभिनेत्री आहे आणि मला छान दिसायचं आहे, त्यामुळे मी या गोष्टी पाळते.
“कोल्हापूरची आई तुम्हाला सद्बुद्धी देवो”
पुढे ती असेही म्हणाली, “बिसलेरी बाटली ६०-७० रुपयांना मिळते. ५० रुपयांना तो बिसलेरीच्या पाण्याचा बाटला मिळतो. त्यात एवढं मी काय महाग आणि खर्चिक केलं? राहिला प्रश्न कोल्हापूरच्या पाण्याचा; कोल्हापूरचं पाणी चांगलंच आहे हे मी त्या व्हिडीओमध्येसुद्धा बोलले आहे. जी काही रिॲलिटी आहे, जे काही शूटिंगच्या दरम्यान घडतं, किस्से मुलाखतीदरम्यान विचारले जातात. तर हा एक किस्सा मला आठवला, तो मी सांगितला. हे सगळं हसत-खेळत चालू होतं. त्या अर्थाचा तुम्ही जो काही अनर्थ केला आहे त्यासाठी मी हात जोडलेत.
शेवटी व्हिडीओमध्ये तिने छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरणही दिलं. तसेच ती म्हणाली की, माझ्याकडून एवढंच स्पष्टीकरण होतं, मी काहीही चुकीचं बोललेले नाही. जर मी चुकीचं बोलले असते तर अख्ख्या कोल्हापूर, महाराष्ट्राची पाय धरून माफी मागायलाही तयार आहे. तेवढी माझ्यात ताकद आहे. पण, एकही वाक्य चुकीचं बोललेले नाहीये. मीसुद्धा महाराजांचीच मुलगी आहे, त्यामुळे मी मोडेन पण वाकणार नाही. जर मी चुकीचं बोलले असेन तर मी १०० वेळा माफी मागेन, पण, जर मी चुकलेली नाहीये तर मी माफी मागणार नाही. कोल्हापूरची आई तुम्हाला सद्बुद्धी देवो, हीच आईकडे मी प्रार्थना करेन, धन्यवाद.”
हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले, “मी माझी बाजू मांडली आहे. बाकी झोपलेल्याला उठवता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्यांना आपण उठवू शकत नाही.”
जान्हवीच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत तिला पाठिंबा दिला आहे.
