Bigg Boss Marathi Season 5 : सध्या सर्वत्र 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाची जोरदार चर्चा सुरू आहे. या पाचव्या पर्वातील प्रत्येक स्पर्धक पहिल्या दिवसापासून आपापल्या स्ट्रॅडजीनुसार खेळताना दिसत आहेत. वाद, राड्यांनी सुरू झालेल्या 'बिग बॉस'च्या या पर्वातील स्पर्धक देखील आता घराघरात पोहोचले आहेत. पण सध्या घरातील 'ए' गटातील सदस्यांची अधिक चर्चा रंगली आहे. सतत वाद, अपमान 'ए' गटातील स्पर्धक करताना दिसत आहेत. त्यापैकी एक म्हणजे जान्हवी किल्लेकर ( Jahnavi Killekar ). 'बिग बॉस' घरात गोंधळ घालणाऱ्या जान्हवीला गेल्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने चांगलंच झापलं. एवढंच नव्हे तर तिला थेट 'बिग बॉस'मधून बाहेर काढण्याची धमकी दिली. वर्षा उसगांवकरांचा केलेला अपमान आणि गोंधळ यामुळे रितेशने जान्हवीला इमेज किल्लर म्हटलं. याच पार्श्वभूमीवर जान्हवीबरोबर काम केलेल्या एका अभिनेत्याने आपलं मत मांडलं आहे. जान्हवीचा मित्र नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या… 'कलर्स मराठी' वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'भाग्य दिले तू मला'मध्ये जान्हवी किल्लेकरने ( Jahnavi Killekar ) खलनायिकाची भूमिका साकारली होती. या मालिकेत तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता अमित रेखीने नुकताच 'मराठी मनोरंजन विश्व' या युट्यूब चॅनलशी संवाद साधला. यावेळी त्याने खऱ्या आयुष्यातील जान्हवी किल्लेकरबद्दल सांगितलं. हेही वाचा - Video: सूर्यवंशी कुटुंबाची खरी लक्ष्मी करणार गृहप्रवेश, पण दुसऱ्याबाजूला घडणार ‘ही’ धक्कादायक घटना अभिनेत्याला विचारण्यात आलं की, तुम्ही दोघं एकत्र २ वर्ष काम करत होता. तर असा एखादा तिचा किस्सा आहे; जो तुला खूप भावला आहे किंवा खूप आवडला आहे. यावर अमित म्हणाला, "ती मॉडर्न दिसते. पण ती खूप भोळी आहे. भोळी म्हणजे एकदम तशी भोळी नाही. ती क्रेझी आहे. कारण आपण तिला काहीपण गोष्ट सांगितली तरी ती त्याच्यावर पटकन विश्वास ठेवते. एक उदाहरण सांगतो. मी, विवेक सांगळे आम्ही असे सगळेजण बसलो होतो. आमचा किरण नावाचा शेड्यूलर होता. तर त्यादिवशी तिला (जान्हवी) कुठेतरी पार्टीला जायचं होतं. तिच्या दुसऱ्या मालिकेच्या सेटवर पार्टी होती. ती पार्टी मिरारोडच्या एका क्लबमध्ये होती." पुढे तो म्हणाला, "तिला पार्टीला पोहोचायचं होतं आणि तिचा एक सीन पेडिंग होता. त्यामुळे ती पटकन आली. शेड्यूलरला विचारायला लागली की, किरण दादा मला लवकर सोड. मला जायचं आहे. तो म्हणाला, तुला किती वाजता जायचं आहे? ती म्हणाली, पार्टी सुरू झालीये. ते म्हणाले, टेन्शन नको घेऊ. १२ वाजेपर्यंत चालू असते. तेव्हा ती म्हणाली, नाही नाही. ट्रॅफिक असतं. बघना किती ट्रॅफिक दाखवतंय. त्यावरती लगेच आमचा विवेक सांगळे म्हणाला, अगं आता ९ वाजलेत ना. १० वाजता किती ट्रॅफिक आहे एकदा बघ. तर ती खरंच चेक करायला लागली १० वाजता किती ट्रॅफिक असेल. मग तिने आम्हाला विचारलं कसं शोधायचं. तर विवेक म्हणाला, तन्वीला विचार. ती एकदा त्यादिवशी गेली होती. तिला एकदा फोन कर. तर तिने तन्वीला फोन लावला तिला म्हणाली, १० वाजता ट्रॅफिक आहे की नाही हे कसं चेक करू. जान्हवी एवढा विश्वास ठेवणारी मुलगी आहे. त्यामुळे तिच्याबरोबर माणूस म्हणून काम करत असताना खूप जॉली आहे, हे कळलं." हेही वाचा – Video: खुशबू तावडेचं दुसरं डोहाळे जेवण घरीच साध्या पद्धतीने पडलं पार, पाहा व्हिडीओ "याआधी वाटलं होतं, घारे डोळे आहे तर खूप डेंजर असेल. पण असं काही नव्हतं. आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करत आम्ही २ वर्ष एकत्र काम केलं. आमच्या रील्सपण सगळ्यांना आवडत होत्या. माझ्या बाबतीत तरी ती इमेज किल्लर अशी २ वर्षात जाणवली नाही", असं स्पष्ट अमित रेखी म्हणाला.