Jahnavi Killekar Fashion Brand Namah Launch: मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार हे आता उद्योजक होऊ लागले आहेत. त्यामध्ये ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हीसुद्धा सहभागी झाली आहे. मुंबईतील सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन, जान्हवी किल्लेकरने नवीन उद्योग सुरू केला आहे.
बिग बॉस मराठीतून घराघरांत पोहोचलेल्या जान्हवी किल्लेकरने नवा फॅशन ब्रॅण्ड सुरू केला आहे. मालिकाविश्वामध्ये आपल्या अभिनय व सौंदर्याने वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर जान्हवी आता बिझनेसवूमन म्हणून नवीन प्रवास सुरू करीत आहे. ‘नमः बाय जान्हवी’ असे तिच्या फॅशन ब्रॅण्डचे नाव असून, त्याद्वारेे ती हा एक फॅशन व स्टायलिश कपड्यांचा बिझनेस करणार आहे.
‘नमः बाय जान्हवी’ या फॅशन ब्रॅण्डची सुरुवात
नव्या प्रवासाची सुरुवात करताना जान्हवीने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. गणरायाच्या आशीर्वादाने तिने ‘नमः बाय जान्हवी’ हा फॅशन ब्रॅण्ड सुरु केला आहे. त्यामध्ये ऑफिस वेअरपासून रोजच्या आयुष्यातील स्टायलिश लूकपर्यंत विविध धाटणीचे कपडे असणार आहेत. कुर्ती, कॉर्ड सेट आणि कॉटन हॅण्डलूमचे कपडे हे ‘नमः बाय जान्हवी’ची खासियत असणार आहे.
उद्योजिका म्हणून नवा प्रवास सुरू करण्याबाबत जान्हवी म्हणाली, “माझ्या स्वप्नांची नवीन सुरुवात करीत आहे. तुमच्या सौंदर्य, व्यक्तिमत्त्व आणि स्टाईलला एक नवीन ओळख देण्यासाठी माझा ‘नमः बाय जान्हवी’ हा नवीन फॅशन ब्रॅण्ड सुरू करीत आहे. प्रत्येक व्यक्तीची खास स्टाईलअसते आणि ती तितकीच खास असावी म्हणून हा ब्रॅण्ड सुरू करीत आहे. हा फक्त एक ब्रॅण्ड नाही, तर ही माझी भावना आहे आणि माझे स्वप्न आहे. ही माझी नवीन ओळख असणार आहे.”
दरम्यान, जान्हवी किल्लेकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून, तिचा मोठा चाहतावर्ग आहे. ‘भाग्य दिले तू मला’, ‘आई तुळजाभवानी’, ‘स्टार प्रवाह’वरील ‘अबोली’ अशा अनेक मालिकांमध्ये जान्हवीने प्रभावीपणे अभिनय साकारला आहे. त्याचबरोबर ती ‘द ५०’ या हिंदी रिॲलिटी शोमध्येसुद्धा सहभागी झाली होती. अभिनय आणि लूकमुळे चर्चेत असलेल्या जान्हवीने आता उद्योजिका म्हणून नवीन प्रवास सुरु केला आहे. जान्हवीवर चाहत्यांनी शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
यापूर्वी अनेक मराठी कलाकारांनी अभिनय क्षेत्राबरोबरच स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे आणि सुरुची अडारकर यांनी स्वत:चा क्लोदिंग ब्रँड सुरू केलेला आहे. त्याचबरोबर अक्षया देवधर, अमृता खालविलकर, प्राजक्ता माळी यांनीही फॅशन व ज्वेलरी ब्रॅण्ड सुरू केले आहेत. त्याचबरोबर माधवी निमकर, समीर खांडेकर, प्रसाद लिमये, ऋतुजा बागवे, श्रेया बुगडे व अनघा अतुल यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे.
