Suraj Chavan Jahnavi Killekar Video: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ‘गुलिगत’ सूरज चव्हाण सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉस जिंकल्यावर अनेकजण सूरजच्या गावी जाऊन त्याची भेट घेत आहेत. अशातच आता जान्हवी किल्लेकर सूरजच्या मोढवे गावात पोहोचली. या दोघांनी त्यांच्या भेटीचे काही फोटो शेअर केले होते. आता त्यांचे व्हिडीओदेखील इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहेत. यात जान्हवी सूरजचे किस्से सांगताना दिसत आहे.
बिग बॉसच्या ७० दिवसांच्या प्रवासात सूरज नॉमिनेट झाल्यावर खूप निवांत असायचा. आम्ही सगळे नॉमिनेशननंतर टेन्शनमध्ये असायचो, असं जान्हवीने तिथे उपस्थिताना सांगितलं. ‘रिटर्न रोहित’ नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाउंटवरून जान्हवी व सूरजच्या भेटीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत जान्हवी म्हणते, “ट्रॉफीच्या वेळी पण म्हणायचा, मला माहीत आहे माझीच ट्रॉफी आहे. इतकं रिलॅक्स कोणी कसं असू शकतं..आम्ही नॉमिनेट झाल्यावर डोकं धरून बसायचो. बापरे, आता नॉमिनेट झालो, आता वोट पडतील, या भाईला टेन्शनच नाही कसलं. शेवटपर्यंत त्याला टेन्शनच नव्हतं, इतका तो रिलॅक्स होता. असा आत्मविश्वास पाहिजे सगळ्यांमध्ये.”
पाहा व्हिडीओ –
जान्हवी व सूरजच्या भेटीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. दोघांचा हा व्हिडीओ पाहून आणि जान्हवीने सूरजचे सांगितलेले किस्से ऐकून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘खऱ्या अर्थाने तुम्ही दोघे जण विजेता आहात कारण जान्हवी यांनी जो शेवटी निर्णय घेतला तो तो खूप योग्य घेतला त्यामुळे फायदाही झाला,’ अशी कमेंट एका युजरने केली. तर काहींनी जान्हवी शो संपल्यानंतर सूरजच्या गावी त्याला भेटायला आली त्याचं कौतुक केलं आहे.
सूरज चव्हाणने जान्हवी किल्लेकरला भेटल्यावरचे काही फोटो त्याच्या अकाउंटवरून पोस्ट केले आहेत. ‘लाडकी माझी ताई’ असं कॅप्शन देत सूरजने हे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले.
दरम्यान, सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला. त्याने १४.६ लाख रुपये व ट्रॉफी आणि इतर बक्षिसं जिंकली. दुसरीकडे जान्हवीने ६ व्या क्रमांकावर असताना ९ लाख रुपये रोख रक्कम घेऊन शो सोडायचा निर्णय घेतला होता. तिच्या या निर्णयाचा तिला फायदा झाला, कारण पैसे घेतले नसते तरी ती सहाव्या क्रमांकावर एलिमिनेट होणार होती.