Jahnavi Killekar Slams Bigg Boss Marathi Season 6 Contestent Radha Mumbaikar : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ काही दिवसांपूर्वीच सुरू झाला आहे. त्यामध्ये विविध क्षेत्रांतील मंडळी सहभागी झाली आहेत. त्यापैकी एक म्हणजे राधा मुंबईकर. राधा पाटील तिच्या नृत्यासाठी ओळखली जाते. पण, अशातच आता ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ ची स्पर्धक जान्हवी किल्लेकर हिनं राधावर टीका केली आहे.

राधा पाटील तिच्या डान्ससाठी ओळखली जाते आणि स्टेजवर तिचा परर्फॉर्मन्स पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करतात. त्यामुळे तिचा मोठा चाहतावर्गही आहे. राधा लावणी आणि डान्सचे इतर फॉर्मही करते, असं तिनं ‘बिग बॉस’च्या घरातही तन्वी कोलतेशी बोलताना सांगितलेलं. पण, अनेकदा तिला लावणीच्या नावाखाली तुम्ही अंगप्रदर्शन करता किंवा लावणीऐवजी वेगळ्या प्रकारचं नृत्य करता आणि त्याला लावणी म्हणता, असंही ऐकवलं जातं. अशातच आता याबद्दल जान्हवीनंसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत प्रतिक्रिया दिली आहे.

जान्हवी किल्लेकर नेमकं काय म्हणाली?

जान्हवी किल्लेकर हिनं इन्स्टाग्रामवर राधाचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये देवीच्या कार्यक्रमात राधा डान्स करताना दिसत आहे. राधा देवीच्या कार्यक्रमात एका रॅपवर डान्स करताना पाहायला मिळत आहे. जान्हवीनं हा व्हिडीओ पोस्ट करीत त्यावर “देवीचा उत्सव; काय होणार महाराष्ट्राचं?” असं लिहिलं आहे. यावेळी टाळ्या वाजवतानाचे इमोजीही तिनं टाकले आहते. अशा प्रकरे जान्हवीनं राधावर टीका केल्याचं दिसत आहे.

जान्हवी किल्लेकरची पोस्ट

जान्हवीने आता याबद्दलचा एक व्हिडीओसुद्धा इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामधून जान्हनी म्हणाली, “मी इन्स्टाग्रामवर स्टोरीला एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यामध्ये राधा पाटील नाचत होती. त्यामुळे बरेच लोक मला असं म्हणाले की तुम्ही राधा पाटीलला स्पोर्ट करत नाही आहात का? तर मला त्या लोकांना सांगायचं आहे की हे राधा पाटीलबद्दल नाहीये. मुद्दा असा आहे की आदिशक्ती प्रतिष्ठाण या मंडळाने आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवाचा तो व्हिडीओ आहे कदाचित. मंडळाचं नाव आदिशक्ती आहे. तिथे देवीचा उत्सव सुरू आहे आणि त्याच ठिकाणी तुम्ही एका स्त्रीला अशा प्रकारे नाचवणं हे अत्यंत चुकीचं आहे. यात चूक राधाची नाहीये. ते तिचं काम आहे कदाचित. तिची नृत्य करण्याची पद्धत ती असू शकते. मला असं वाटतं की लोकांनी अशा गोष्टीचं भान ठेवायला हवं की देवीचा उत्सव आहे आणि ज्या प्रकारे आपण स्त्रीला नाचवत आहोत ते चुकीचं आहे. मी राधालासुद्धा हेच सांगेन की आपण कोणत्या कार्यक्रमात नाचतोय याचं भान ठेवायला हवं.”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ मधील अलीकडेच प्रसारित झालेल्या एका भागात अभिनेत्री दीपाली सय्यद हिनंसुद्धा राधा ज्या प्रकारचा डान्स करते, त्याबद्दल तिचा उल्लेख न करता वक्तव्य केलेलं. अभिनेत्री त्यावेळी घरातील इतर स्पर्धकांशी बोलताना म्हणाली होती की, आता ज्या प्रकारची लावणी केली जाते त्यात आणि पूर्वी जी लावणी केली जायची त्यात खूप तफावत आहे. हल्ली बऱ्याचदा अंगप्रदर्शन केलं जातं आणि त्याला लावणीच्या नावाखाली खपवलं जातं. यावेळी राधा व तन्वी कोलते यांच्यामध्ये याबाबत संवादही झालेला.

राधा त्यावेळी म्हणालेली, “मला जेव्हा कळलं की, दीपाली या पर्वात असणार आहे तेव्हा मी ठरवलेलं की, मी तिचा आदर करणार आणि मी खूप आनंदी होते. मी कधीही म्हणत नाही की, मी लावणी करते. मी कार्यक्रमांमध्ये फक्त एक लावणी सादर करते आणि त्यानंतर मिक्स गाण्यांवर डान्स करते. आता लोकांना ते आवडतं, ते गर्दी करतात म्हणून आम्ही करतो. दीपालीनं तर काहीच केलेलं नाहीये.”