‘बिग बॉस मराठी’च्या घरातून नुकतीच रुचिता जामदारची एक्झिट झाली. शोमधून बाहेर आल्यावर तिने माझ्याबद्दल चांगल्या गोष्टी दाखवल्या गेल्या नाहीत, भाऊच्या धक्क्यावर बोलू दिलं नाही असा दावा अनेक मुलाखतींमध्ये केला. यानंतर जान्हवी किल्लेकरने सविस्तर व्हिडीओ शेअर करत रुचिताचा चांगलाच समाचार घेतला आहे. तू शोमधील सदस्यांबद्दल काहीही बोल पण, बिग बॉस आणि रितेश सरांविरोधात चुकीचं बोलू नकोस…ते खपवून घेतलं जाणार नाही असं स्पष्ट मत जान्हवीने मांडलं आहे.
जान्हवी या व्हिडीओमध्ये म्हणते, “आज मला तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या महाराष्ट्रात आज अनेक क्रिएटर्स आहेत, अभिनेते आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांना मनापासून ‘बिग बॉस’च्या घरात जायचंय. ‘बिग बॉस’मध्ये एकदा तरी जाता यावं यासाठी हे लोक धडपड करताहेत, रडत आहेत…एकदा तरी आम्हाला शोमध्ये घ्या इतकंच त्यांचं म्हणणं आहे. कारण, ‘बिग बॉस’ या शोचं नाव खूप मोठं आहे. या शोमध्ये जाण्यासाठी लोक काहीही करू शकतात. पण, ज्या लोकांना या शोमध्ये जाण्याची संधी मिळते…या संधीचं सोनं करायचं सोडून तुम्ही आतमध्ये एकतर माती खाऊन बाहेर येता…ज्या कार्यक्रमाने तुम्हाला ओळख दिली, ज्यामुळे तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं…त्याच कार्यक्रमाला तुम्ही बाहेर येऊन नावं ठेवता. निदान इतकं तरी नका बोलू…आणि रितेश सरांच्या बाबतीत तर कोणीही काहीच बोलू नये. रितेश सर अत्यंत चांगले माणूस आहेत.”
जान्हवी पुढे म्हणते, “आता तुम्हाला समजलं असेलच की मी कोणाबद्दल बोलतेय…खरंतर नाव घ्यायला काहीच हरकत नाहीये, मी रुचिताबद्दल बोलतेय. ती घराबाहेर आल्यावर बिग बॉसबद्दल जे काही बोलतेय ते चुकीचं आहे. माझं असं झालंय अरे कोण आहेस तू? रादर कोण होतीस तू? पण, बिग बॉसमुळे तुला संधी मिळाली. अर्थात, चुका प्रत्येकाकडून होतात, राग येतो…शब्द चुकतात. मी स्वत: सुद्धा त्या सगळ्या चुका केलेल्या आहेत.”
“पण, ज्या शोमुळे आपल्याला इतक्या गोष्टी मिळाल्या. आपलं सगळीकडे नाव झालं, चर्चा झाली. निदान त्या शोबद्दल तरी वाईट बोलू नका. तुम्ही घरातील सदस्यांबद्दल बोला…बाकीचं काही बोला. पण, बिग बॉस शोबद्दल आणि रितेश सरांबद्दल तुम्ही असं काहीही बोलू शकत नाही. आता तिचं म्हणणं असं आहे की, बिग बॉसने मला चुकीचं दाखवलं…आता त्यांना तुला चुकीचं दाखवून काय मिळणारे? जे तू आतमध्ये करणार ते ‘बिग बॉस’ दाखवणार.”
“आता आमच्या सीझनला मला सर्वात जास्त ओरडा मिळालाय, मला शिक्षा सुद्धा झाली होती. पण, आजपर्यंत कधीही मी बिग बॉसला नावं ठेवलेली नाहीयेत किंवा रितेश सरांकडे नजर वर करून सुद्धा पाहिलेलं नाहीये. कारण, ते या शोचे होस्ट आहेत. इतका मोठा व्यक्ती आपल्याशी बोलतोय…हीच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही काहीही करा पण, या शोला नावं ठेवू नका. मला या शोने खूप काही दिलं…मी यापूर्वी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं होतं. पण, संपूर्ण महाराष्ट्रात माझी ओळख निर्माण झाली बिग बॉसमुळे…यामुळे मला ‘The 50’ शोमध्ये जायची सुद्धा संधी मिळाली. त्यामुळे मी आता घराबाहेर येणाऱ्या सदस्यांना इतकंच सांगेन…तुम्ही काहीही बोला… पण, शोच्या विरोधात बोललात तर मी खपवून घेणार नाही आणि रितेश सरांच्या विरोधात तर अजिबातच बोलायचं नाही.”
दरम्यान, जान्हवी किल्लेकरच्या या व्हिडीओवर असंख्य नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिच्या मताबद्दल सहमती दर्शवली आहे. “ज्या शोने ओळख निर्माण करून दिली…त्याबद्दल वाईट बोलणं चुकीचं आहे” अशाच कमेंट्स नेटकऱ्यांनी सुद्धा या व्हिडीओवर केल्या आहेत.
