Suraj Chavan & Jahnavi Killekar : ‘गुलीगत किंग’ सूरज चव्हाणने नुकतीच त्याच्या चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे. जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर सूरज बाबा झाला असून, त्याच्या घरी गोंडस अशा चिमुकलीचं आगमन झालेलं आहे. सूरज बाबा झाल्याचं समजताच त्याच्या चाहत्यांनी या ‘गुलीगत किंग’ला भरभरून शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय त्याची मानलेली बहीण लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सुद्धा त्याच्या बाळाला भेटण्यासाठी सूरजच्या गावी पोहोचली आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या ५ व्या सीझनमुळे जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण यांची भेट झाली. शोमध्ये या दोघांची कितीही भांडणं झाली असली तरीही जान्हवी त्याला ‘बिग बॉस’च्या घरात असतानाच मनापासून आपला भाऊ मानायची. विशेष म्हणजे, सूरज-जान्हवीने हे भावा-बहिणीचं नातं आजही जपलं आहे. जान्हवीने त्याला प्रत्येकक्षणी पाठिंबा दिला. त्याच्या लग्नसोहळ्याला सुद्धा अभिनेत्री सगळे दिवस त्याच्या घरी उपस्थित होती.
याशिवाय जान्हवी संजनाच्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाला सुद्धा गेली होती. त्यामुळे आता लाडक्या भावाच्या घरी लक्ष्मीचं आगमन झाल्याने अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सूरजच्या बाळाला पाहण्यासाठी अभिनेत्री वेळात वेळ काढून हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. जान्हवीने बाळाला पाहण्याआधी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक ती सगळी काळजी घेतली आणि तिने संजना व बाळाची मोठ्या आपुलकीने, मायेनं विचारपूस केली.
जान्हवीने मोठ्या आनंदात अख्ख्या हॉस्पिटलमध्ये बर्फी वाटल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी सूरज तिथे उपस्थित नव्हता. त्यामुळे, जान्हवीने फक्त संजना आणि बाळाची भेट घेतली. यावेळी छोट्या परीला पाहून जान्हवीचं मनही भरून आलं होतं. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले.
जान्हवी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “आमच्या छोट्या परीचं आगमन झालेलं आहे…खूप-खूप अभिनंदन! मी आत्याबाई झालेय. तसेच सूरज-संजनाचंही अभिनंदन”
नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “किती गोड यार…”, “आपुलकी शिकावी तर तुझ्याकडून…जान्हवी आत्या तुझंही अभिनंदन”, “काहीही म्हणा जान्हवीला पाहून मन भरून आलं”, “किती सुंदर नातं निभावतेय जान्हवी…आता ती आत्या झालीये!”, “खूप गोड व्हिडीओ आहे जान्हवी”, “आजकाल सख्खे सुद्धा एवढी साथ देत नाहीत”, “तुझा स्वभाव खूपच छान आहे ताई”, “याला म्हणतात खरी माणुसकी” अशा असंख्य प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.
