The 50 Marathi Show: सध्या ‘द ५०’ या शोची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. आता शो शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामध्ये एकूण ५० स्पर्धक सहभागी झाले होते. या शोमध्ये मराठी कलाकारदेखील स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. शिव ठाकरे, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, आर्या, अरबाज हेदेखील ‘द ५०’मध्ये सहभागी झाले होते.

काही दिवसांपूर्वी जान्हवी किल्लेकर या शोमधून बाहेर पडली. तेव्हा शिव ठाकरेने तिला पाठिंबा दिला नसल्याचे वक्तव्य तिने केले होते. आता अभिनेत्रीने नुकतीच ‘नवशक्ति’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला त्याबद्दल विचारले गेले.

जान्हवी किल्लेकर शिव ठाकरेबद्दल काय म्हणाली?

जान्हवीला विचारले गेले की, जेव्हा तुझं एव्हिक्शन झालं, तेव्हा तू दुसऱ्या ग्रुपमध्ये खेळत होतीस, मग तू शिव ठाकरेकडून का अपेक्षा करत होतीस? त्यावर जान्हवी किल्लेकर म्हणाली, “मी दुसऱ्या टीममध्ये खेळत होते; पण मी शिवबद्दल कधीच वाईट विचार केला नाही. आमचा टास्क होता, ज्यामध्ये आम्ही ४९ लोक खेळत होतो. त्यातील पाच लोकांना गोल्डन कार्ड मिळाले होते. त्यातील मी एक होते. त्यावेळी शिव ठाकरे माझ्याकडे आला.”

“तो मला म्हणाला की, तिकडे मला कोणी कार्ड देत नाहीये. तर मी आऊट होईन. तू मला तुझं कार्ड दे. निक्की-अरबाज मला म्हणत होते की, तू वेडी आहेस का? तू याचं काय ऐकतेस? पण मी म्हटलं की, तो नॉमिनेट होईल. निक्की-अरबाज मला समजावत होते की, आपला ग्रुप आहे आणि आपल्या ग्रुपमध्ये फक्त तुला एकटीला गोल्डन कार्ड मिळालेलं आहे. तरीही मी निक्की-अरबाजशी भांडले.”

“मी त्यांना म्हणाले की, जर शिव माझ्याकडे गोल्डन कार्ड मागत असेल, तर मी त्याला ते कार्ड देईन. मी त्याला ते गोल्डन कार्ड दिले आणि तो तिकडे खेळायला सुद्धा गेला. पण तो खेळायला गेल्यानंतर अनाउन्समेंट झाली की जान्हवी तू तुझं कार्ड इतर कोणालाही देऊ शकत नाही. हे सगळे एपिसोड मध्ये दाखवलं नाही. तुम्ही याबद्दल शिव ठाकरेलासुद्धा विचारू शकता. म्हणून मला त्याच्याकडून अपेक्षा होती.”

पुढे ती असेही म्हणाली, “लोकांची चूक नाहीये. कारण- लोकांना ते दाखवलं गेलं नाही. मीही तो एपिसोड बघितला आहे. लोकांना ते दिसलंच नाही. पण, मला माहीत आहे की, मी शिव ठाकरेसाठी काय केलं आहे. मी त्याला हेही म्हणाले होते की, शिव ज्या दिवशी तू नॉमिनेट होशील आणि तुझ्या ग्रुपमधले व्होट तुला कमी पडतील, त्या दिवशी मी माझ्या ग्रुपमधील कुठल्याही माणसाला व्होट देणार नाही, मी तुला व्होट देईन. भलेही तू दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेस”, असे म्हणत जान्हवी किल्लेकरने तिची बाजू मांडली.

दरम्यान, ती मुलाखतीत असेही म्हणाली की भलेही शिव माझ्याशी वाईट वागला. तरी त्याने खेळात पुढे जावे अशीच इच्छा आहे.