Janhvi Killekar Dahihandi Viral Video Anchor Controversy: बिग बॉस फेम मराठमोळी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ही सध्या तिच्या दहीहंडीतील व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. दहीहंडीच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमामध्ये जान्हवी सहभागी झाली होती. मात्र, यावेळी तिचा मंचावरील व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये जान्हवी किल्लेकर दहीहंडी आयोजकावर प्रचंड चिडल्याचे तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. या व्हायरल व्हिडीओवर जान्हवी किल्लेकरने स्वतः प्रतिक्रिया देत नेमके काय झाले होते हे सांगितले आहे.
मराठमोळी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ही तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. पुण्यातील नांदेड सिटीजवळ आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सावामध्ये जान्हवी सहभागी झाली होती. यावेळी तिच्याबरोबर रीलस्टार प्रणाली सूर्यवंशी उपस्थित होती. यावेळी जान्हवी बोलणार इतक्यात अँकरने प्रणालीच्या नावाची घोषणा केल्याने जान्हवी किल्लेकर चिडली. यावर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगल्यानंतर आता ‘अल्ट्रा मराठी बझ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये जान्हवीने मंचावर नेमके काय झाले होते ते सांगितले.
दहीहंडीच्या स्टेजवर जान्हवी किल्लेकर नेमकी का चिडलेली?
जान्हवी किल्लेकर म्हणाली, “दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला त्या स्टेजवर खूप शांतता होती. डीजे वाजत होता, पण लोक नाचतसुद्धा नव्हती आणि एक शांतता होती, त्यामुळे एक कलाकार म्हणून खूप अशी शांतता मला नाही आवडत. लोकांचे मनोरंजन करायचे हे तर माझे काम आहे, म्हणून मी आयोजकांना सांगितले की, सर माझ्या हातात माईक द्या, मी काहीतरी बोलायला सुरुवात करते. त्यानंतर साऊंडवाल्यांनी मला माईक दिला. कारण-शांतता नको होती, म्हणून मी बोलायला सुरुवात करणार होते.”
पुढे जान्हवी म्हणाली, “मी माईक घेऊन बोलणार, यानंतर त्या अँकरला अचानक जाग आली आणि त्या कळलं की, तो या शोचा अँकर आहे. मी बोलणार इतक्यात त्याने घोषणा द्यायला सुरुवात केली. तो माझी ओळख करून द्यायला लागला आणि या दोन मिनिट संवाद साधतील असे म्हणाला. यानंतर लगेच त्याने दुसरी जी रीलस्टार होती तिची ओळख करून दिली आणि लोकांना विचारले की, त्यांचा हा प्रसिद्ध डायलॉग ऐकायचा आहे का?”
माझ्या डोक्यात सनक गेली – जान्हवी किल्लेकर
जान्हवी किल्लेकर पुढे म्हणाली, “प्रत्येक लोकांच्या आवडी-निवडी या वेगवेगळ्या असतात, त्यामुळे तिचा कोणतातरी डायलॉग फेमस आहे, जो लोकांना आवडत होता आणि मला त्याचे कौतुकच आहे. माझ्या हातात माईक होता आणि मी लोकांशी आता बोलणारच होते, तेवढ्यात तो अँकर म्हणाला की, त्या नंतर बोलणार आहेत. त्यावेळी लगेच माझ्या डोक्यात सनक गेली.”
व्हायरल व्हिडीओबाबत जान्हवी किल्लेकरने सांगितले सत्य
व्हायरल व्हिडीओवर जान्हवी म्हणाली, “मी वळून त्यांना म्हणाले की, ‘माझ्या हातात माईक आहे, तुम्ही जर अँकर आहात तर कोणाच्या हातात माईक आणि आता कोण बोलणार आहे हे बघणे तुमचं काम आहे; याचं भान तुम्हाला राहिलं पाहिजे,’ असं मी त्यांना बोलले. मी मागे वळून त्यांना काय बोलले हे लोकांना माहीत नाही. लोकांना एवढंच दिसलं की जान्हवी भडकली आहे, पण मी का चिडले होते हे कोणालाच माहीत नाही.”
