This Actress Talks About CID : मनोरंजनविश्वात काम करत असताना अनेक कलाकारांबरोबर अनेकदा वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. प्रत्येकाचे वेगळे अनुभव असतात. कलाकार मंडळी मुलाखतींमधून ते शेअर करत असतात. अशातच आता लोकप्रिय अभिनेत्रीनेही तिला लोकप्रिय कार्यक्रमातून जबरदस्तीने काढून टाकण्यात आलेलं असं म्हटलं आहे.

‘सीआयडी’ हा हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय क्राइम शो होता. मराठमोळे अभिनेते शिवाजी साटम यामध्ये मुख्य भूमिकेत होते, तर हिंदी टेलिव्हिजनवरील अनेक लोकप्रिय कलाकार यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकलेले. अशातच आता या कार्यक्रमातील लोकप्रिय अभिनेत्रीने तिला जबरदस्तीने कार्यक्रमातून काढण्यात आलेलं असं म्हटलं आहे. ही अभिनेत्री कोण आहे आणि ती नेमकं काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

नेमकं काय म्हणाली अभिनेत्री?

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’, ‘क्राइम पेट्रोल’, ‘सीआयडी’ यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये काम केलेली अभिनेत्री म्हणजे जसवीर कौर. जसवीरने अशातच ‘सीआयडी’ या लोकप्रिय कार्यक्रमात काम करण्याचा तिचा अनुभव सांगत तिला या शोमधून काढून टाकण्यात आलेलं. याबद्दल सांगितलं आहे.सुभोजीत घोषसह संवाद साधताना जसवीर म्हणाली, “त्यांनी मला ऑफिसला बोलावून तू नीट चालत नाही, तुझा अॅटिट्यूड चुकीचा आहे असं म्हणत मला काढून टाकलं. त्यांनी काळ्या जादूचा एपिसोड प्रसारित झाल्यानंतर मला ऑफिसला बोलावलं आणि शो सोडायला सांगितला. त्यांनी माझ्यावर हे सगळे आरोप करत मी संवाद नसतानाही स्क्रीप्ट घेऊन असायचे आणि चुकीची भाषा वापरायचे असंही म्हटलं.”

यामुळे जसवीरला धक्का बसला आणि याचा तिला त्रास झाल्याचं तिने यावेळी सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, “मी ४५ दिवस रडत होते. मला काय चुकलं आहे हे कळतच नव्हतं. मी २२ महिने त्या शोसाठी मेहनत केली आणि एक दिवस अचानक त्यांनी मला बोलावलं आणि शो सोडायला सांगितला.” पुढे तिने तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे काहीच साध्य झालं नाही असं म्हटलं आहे. जसवीर म्हणाली, “४५ दिवस चर्चा सुरू होती. राउंड टेबलच्या मिटिंग व्हायच्या आणि माझ्या डोळ्यांत अश्रू असायचे. तेव्हाच मला जाणवलं की हे आता थांबायला हवं आणि मी तिथून बाहेर पडले.”

जसवीरने अनेक वर्षे याबद्दल कोणालाच सांगितलं नव्हतं असं म्हटलं आहे. ती याबद्दल म्हणाली, “माझ्या काही जवळच्या मित्रांनाच फक्त माहीत आहे की मला शोमधून काढण्यात आलेलं. जेव्हा चाहते मला याबद्दल विचारायचे तेव्हा मी हा निर्मिती संस्थेचा निर्णय आहे एवढंच म्हणायचे. माझ्या कोणत्याही सहकलाकाराने मला त्यावेळी मदत केली नाही, कोणीच माझी विचारपूसही केली नाही.”

दरम्यान, जसवीरने ‘सीआयडी’मध्ये काजल हे पात्र साकारलेलं. सध्या ‘स्टार प्लस’वरील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. ती यामध्ये देविका मेहता हे पात्र साकारत आहे.