जय दुधाणेला काही महिन्यांपूर्वी मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली होती. त्याने कोट्यवधींची आर्थिक फसवणूक केली अशी चर्चा त्यावेळी झाली होती. अशातच आता अनेक महिन्यांनंतर अखेर याबद्दल भाष्य केलं असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कठीण काळात त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांबद्दल रोष व्यक्त केला आहे

जयने यावेळी त्याला कठीण काळात साथ दिल्याने त्याच्या बायकोचेही आभार मानले आहेत. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी आणि पोस्ट शेअर करत याबद्दल प्रतिक्रिया दिलीये. जय इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत म्हणाला, “खूप प्रश्न विचारले गेले. अनेकांनी मला खाली खेचण्याचा आणि परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्या प्रश्नांची पुराव्यांसकट उत्तर दिलं जातील.” पुढे त्याने #Peaceout2020 असं हॅशटॅग वापरलं आहे.

जय दुधाणेची इन्स्टाग्राम स्टोरी

जयने बायकोचे मानले आभार

जय दुधाणेने याचसह इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यामधून त्याने त्याची बायको सोशल मिडिया क्रिएटर हर्षला पाटीलचं कौतुक करत आभार मानले आहेत. जय म्हणाला, “जेव्हा मी माझ्या आयुष्यातील खूप कठीण काळातून जात होतो तेव्हा तू फक्त सगळं ठीक होईल असा विश्वास दिला नाहीस तर तू माझी साथही दिली. तू त्या गोष्टी ऐकल्यास ज्या मी सगळ्यांना सांगू शकत नव्हतो आणि मला येणाऱ्या प्रत्येक नवीन दिवसाला सामोरं जाण्याचं बळ दिलंस जे माझ्यामध्ये अजिबातच राहिलं नव्हतं. तू मला कधीच माझ्या समस्या ओझं आहेत असं जाणवू दिलं नाहीस. तू माझ्याबरोबर ते वाटून घेतलं. मला जाणीव करुन दिलीस की मी कोण आहे जेव्हा मी स्वत:च विसरलो होतो आणि माझ्यावर विश्वास ठेवला जेव्हा माझा स्वत:वर विश्वासही उरला नव्हता.हे मी कधीच विसरणार नाही.”

पुढे तो म्हणाला, “माझ्या कठीण काळात तू फक्त माझी बायको नव्हती तर तू ती व्यक्ती होतीस जिने मला मी खचून जात असताना आधार आणि धीर दिला. त्यामुळे जर मी पुन्हा कधी तितका खंबीर झालोच तर त्याचं एक कारण तू असशील. सगळ्यासाठी खूप धन्यवाद. आय लव्ह यू मिसेस दुधाणे.”

दरम्यान, टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार ‘स्प्लिट्सविला १३’ आणि ‘बिग बॉस मराठी ३’ फेम जय दुधाणेला ४.६१ कोटी रुपयांच्या रिअल इस्टेट घोटाळ्याप्रकरणी मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. जय आणि त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.