JD Majethia Nipa Majethia Wedding Anniversary: मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते जेडी मजीठिया सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. ‘खिचडी’ मधील ‘हिमांशु’ म्हणून लोकप्रिय असलेल्या जेडी यांनी ११ मार्च रोजी आपल्या लग्नाचा ३० वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. ३० वर्षांपूर्वी जेडी आणि निपा यांनी घाईघाईत कोर्ट मॅरेज केले होते, ज्यामुळे त्यांना पारंपरिक पद्धतीने सात फेरे घेता आले नव्हते. हीच कसर भरून काढण्यासाठी त्यांच्या दोन्ही मुलींनी पुढाकार घेतला आणि आई-बाबांचे पुन्हा लग्न लावून दिले. विशेष म्हणजे, या लग्नाआधी जेडी मजीठिया यांना त्यांच्या मुलींनी ‘बॅचलर पार्टी’ देखील दिली, ज्याचा खुलासा त्यांनी स्वतः एका मुलाखतीत केला आहे.

५७ वर्षांचे जेडी मजीठिया नेहमीच आपले खासगी आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवतात, त्यामुळे त्यांनी कधीही आपल्या वैयक्तिक जीवनावर उघडपणे भाष्य केले नव्हते. मात्र, तब्बल ३० वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात असा एक क्षण आला, ज्याचा आनंद चाहत्यांबरोबर शेअर करण्यापासून ते स्वतःला रोखू शकले नाही. जेडी यांनी ३० वर्षांपूर्वी, ११ मार्च रोजी निपा मजीठिया यांच्याशी कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर त्यांनी मथुरेत जाऊन भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले होते. मग अवघ्या तीन दिवसांनी एका नाटकाच्या दौऱ्यासाठी ते अमेरिकेला रवाना झाले होते.

लग्नाबद्दल काय म्हणाले जेडी मजीठिया?

त्यावेळी त्यांचे लग्न भारतीय रीतिरिवाजांनुसार होऊ शकले नव्हते. हीच कसर भरून काढण्यासाठी, लग्नाला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा लग्न केले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “तीन दशकांपूर्वी मी सात फेरे घेऊ शकलो नव्हतो, याची खंत मला नेहमी वाटायची. आता माझ्या दोन्ही मुलींनी आमच्या लग्नाचं सगळं नियोजन केलं. लग्नाआधी त्यांनी मला आणि माझ्या पत्नीला ‘बॅचलर पार्टी’ देखील दिली. आता आमचं वैवाहिक आयुष्य पुन्हा नव्याने सुरू झालंय असं वाटत आहे.”

Award Banner

जेडी आणि निपा यांनी हळद, मेहंदीपासून ते सात फेरे, असे सर्व विधी करून लग्न केले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्यांचे कुटुंबीय आणि चाहते भारावून गेले आहेत. सर्वजण त्यांना शुभेच्छा देत आहेत.

जेडी यांनी खिचडी, साराभाई व्हर्सेस साराभाई, करिश्मा का करिश्मा, वागळे की दुनिया या मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. निर्माता/दिग्दर्शक म्हणून त्यांनी बा बहू और बेबी, साराभाई व्हर्सेस साराभाई, खिचडी आणि इन्स्टंट खिचडी, भाकरवडी, पुष्पा इम्पॉसिबल, आर के लक्ष्मण की दुनिया या मालिका केल्या. राजेश मापुस्कर दिग्दर्शित व्हेंटिलेटर या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.